गडचिरोलीत 8 जानेवारी पासून अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह; * दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धां होणार * राष्ट्रीय दृष्टीहीन संघ व मैत्री परिवार संस्थेच्या वतीने आयोजन

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र व मैत्री परिवार संस्था, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ३६ वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह दिनांक ८ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत गडचिरोली येथे साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी आज सोमवारी अभिनव लॉन मध्यें आयोजीत पत्रकार परिषदेतून दिली.
या सप्ताहात महाराष्ट्रातील १५ अंध विद्यालयांतील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार असून विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वक्तृत्व, काव्यवाचन, गायन, ब्रेल वाचन, नृत्य, निबंध लेखन, मनाचे श्लोक व प्रश्नमंजुषा या स्पर्धांचा समावेश आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचा प्रवास, निवास, भोजन व बक्षिसे यांची संपूर्ण व्यवस्था गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक संस्था, दानदाते व सामाजिक बांधवांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. यासाठी आयोजकांनी दानशूर व्यक्ती व संस्थांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी अंध विद्यार्थ्यांची प्रभात फेरी शहरातून काढण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोलीकरांच्या मनोरंजनासाठी १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता रोशनी म्युझिकल ग्रुप, नागपूर यांचा भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून “अशी रंगली रात्र” या कार्यक्रमाद्वारे सांस्कृतिक संध्या रंगणार आहे.
पत्रकार परिषदेस भोजराज पाटील (उपाध्यक्ष, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र), सुहास खरे (अध्यक्ष, माऊली मित्र मंडळ नागपूर), निरंजन वासेकर (अध्यक्ष, मैत्री परिवार गडचिरोली), अविनाश चडगुलवार (सचिव, मैत्री परिवार गडचिरोली), अश्विनी भांडेकर (महिला प्रमुख, मैत्री परिवार गडचिरोली), प्रकाश मुद्दमवार (सभासद, मैत्री परिवार), प्रमोद धात्रक (सभासद, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र) आदी उपस्थित होते.