जिल्हा

नक्षलपीडीत कुटुंबांच्या जीवनात निर्माण झाला स्थैर्य आणि आशेचा नवा किरण !  * नक्षलपीडीत कुटुंबातील 29 तरूणांना नववर्षाचे ‘गिप्ट’   * थेट शिपाई पदावर नियुक्ती * जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

AVB NEWS गडचिरोली :-  नक्षलवादामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी व त्यांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने नववर्षाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वपूर्ण निर्णय अंमलात आणला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या पुढाकारातून नक्षलपीडित कुटुंबातील २९ तरुणांना शासनसेवेत सामावून घेत जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाई पदावर नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात स्थैर्य आणि आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हिंसाचारात गोपनीय माहितीदारांची हत्या झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णयान्वये अशा कुटुंबातील एका सदस्याला शासनसेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान रिक्त पदांचा अभाव ही मोठी अडचण ठरत होती. ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी वरिष्ठ स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करत जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पूर्वी निरसीत करण्यात आलेली २९ शिपाई संवर्गाची पदे पुनर्जीवित करून घेतली.

या प्रशासकीय प्रयत्नांचे फलित म्हणून ०१ जानेवारी २०२६ रोजी नक्षलपीडित कुटुंबातील २९ उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाई पदावर रुजू होण्यासाठी नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते या नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, शासनसेवेत प्रवेश मिळालेली ही संधी केवळ रोजगारापुरती मर्यादित नसून समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून काम करण्याची संधी आहे. सेवेत कार्यरत असताना नियमांचे काटेकोर पालन, जनतेप्रती संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

तसेच, सेवेत रुजू होताना आवश्यक असलेले प्रशिक्षण प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन देत त्यांनी नवनियुक्त सर्व २९ कर्मचाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे, आस्थापना शाखेचे तहसीलदार सचिन जयस्वाल तसेच नवनियुक्त कर्मचारी उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.