नवे सभागृह तेली समाजाच्या सामाजिक एकतेचे व विकासाचे प्रतीक ठरेल ! * ;नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांचे प्रतिपादन * तेली समाजाच्या सभागृहाचे लोकार्पण व सत्कार सोहळा

AVB NEWS गडचिरोली : नवेगाव येथे श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जि. बहु. संस्था यांच्या सौजन्याने आयोजित सभागृह लोकार्पण सोहळा, ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, प्राविण्यप्राप्त विद्यार्थी सत्कार तसेच महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या भव्य कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या प्रणोती सागर निंबोरकर यांनी आपल्या सुसंस्कृत, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली.
नव्या सभागृहाचे लोकार्पण माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले असून अध्यक्षस्थानी भगवानजी ठाकरे विराजमान होते. या प्रसंगी प्रणोती निंबोरकर यांनी समाजकार्य, महिलांचे सक्षमीकरण, युवकांचे शिक्षण व संस्कार यावर मनोगत व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या विचारांमधून समाजातील प्रत्येक घटकासाठी सकारात्मक दिशा व प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास प्रभा भरडकर, भाग्यवाण खोब्रागडे, नगरसेवक लीलाधर भरडकर, नवेगावचे उपसरपंच राजू खंगार, नगरसेवक सागर निंबोरकर, माजी सरपंच नंदकिशोर मांदाडे, डॉ. बळवंत लाकडे, विठ्ठल निकुले, प्रभाकर वासेकर, विकास वडेट्टीवार, लता कोलते, सामाजिक कार्यकर्ते मोहन ठाकरे, सुरेश भांडेकर, डॉ. सूचित लाकडे, एश्वर्या लाकडे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमामुळे सभागृह आनंद, सन्मान व सामाजिक एकतेच्या भावनेने भारावून गेले. विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रणोती सागर निंबोरकर यांची सौम्य पण ठाम भूमिका, समाजाशी असलेली जिव्हाळ्याची नाळ आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्या उपस्थितांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरल्या. कार्यक्रमानंतरही नागरिकांनी त्यांच्याशी संवाद साधत कौतुकाची थाप दिली. एकूणच हा सोहळा समाजएकतेचे व विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.