जिल्हा

वरद फेरो अलॉयजच्या २५०० कोटींच्या स्टील प्रकल्पाची जनसुनावणी; १५०० रोजगारांची शक्यता

AVB NEWS गडचिरोली ,:- वरद फेरो अलॉयज प्रा. लि. या कंपनीच्या प्रस्तावित सुमारे २५०० कोटी रुपयांच्या एकात्मिक स्टील प्रकल्पाची पर्यावरणीय जनसुनावणी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात पार पडली. हा प्रकल्प परिसरातील औद्योगिक विकासाला चालना देणारा ठरणार असून अंदाजे १२०० ते १५०० थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

कंपनीने सादर केलेल्या माहितीनुसार स्थानिक युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व तांत्रिक कौशल्यांनुसार रोजगारात प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच आसपासच्या गावांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी ठेवण्यात येणार असून पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता आणि उपजीविकेच्या संधी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी १६५ कोटी रुपये पर्यावरण संरक्षणासाठी भांडवली स्वरूपात राखीव ठेवले असून प्रदूषण नियंत्रण प्रणालीच्या देखभाल व निरीक्षणासाठी दरवर्षी सुमारे १७ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. वायू, पाणी, मृदा आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
प्रकल्प परिसरात २७.६२ हेक्टर क्षेत्रावर हरितपट्टा विकसित केला जाणार असून हे एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ३५ टक्के असेल. प्रति हेक्टर २५०० झाडांच्या प्रमाणात सुमारे ६९,०५० झाडे लावण्याचे नियोजन आहे. तसेच प्रकल्पाच्या सीमेजवळ किमान १५ मीटर रुंदीचा हरितपट्टा उभारला जाणार आहे.

या जनसुनावणीला Maharashtra Pollution Control Board, चंद्रपूर येथील प्रादेशिक अधिकारी व पथक उपस्थित होते. तसेच माजी मंत्री व अहेरी मतदारसंघाचे आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम आणि गडचिरोली मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावली.
यावेळी आमदारांनी गडचिरोली जिल्ह्याला “स्टील हब” बनवण्यासाठी अशा उद्योगांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. तसेच प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी व नागरिकांना योग्य मोबदला, रोजगार व पायाभूत सुविधा देत पर्यावरणपूरक पद्धतीने उद्योग सुरू करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.