गोंडवाना विद्यापीठातील कामगारांची पुरवठादार एजन्सीकडून आर्थिक पिळवणूक ..! * असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांचा आरोप * एजन्सी व दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे मागणी

AVB NEWS गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठात कुशल व अकुशल कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नसून कामगारांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी केला आहे. याला जबाबदर असलेल्या एजन्सी आणि विद्यापीठातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पेंदोरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
श्री. पेंदोरकर यांनी यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात कुशल व अकुशल कर्मचारी, कामगार नियुक्तीचे काम दुर्गेश इंडस्टीयल सिक्युरीटी प्रा. लि. वडगाव, जिल्हा चंद्रपूर येथील एजन्सीला देण्यात आले आहे. सदर कंपनीला कोणताही अनुभव नसतांना आणि सदर कंपनी केवळ सुरक्षारक्षक पुरवठा करीत असतांना कंपनीला लिपीक, शिपाई, परिचारीका आणि वाहनचालक पुरवठा करण्याचे काम देण्यात आले आहे.
निवीदा सुचनेत 12 महिन्याचे पुरवठा आदेश नमूद असतांना त्यात परस्पर 6 महिन्याचे आदेश देण्यात आले. कर्मचारी पुरवठाधारकाकडून नियबाहय देयके सादर करण्यात येत असून आर्थिक लाभापोटी विद्यापीठ प्रशासन शहनिशा न करता देयके कंपनीला अदा करण्यात येत आहेत विशेष म्हणजे ऑगस्ट 2025 च्या देयकात 26 कामगार कामावर असतांना 27 कामगारांचे देयक काढण्यात आल्याचे माहिती अधिकारीतील माहितीवरून दिसून येत असल्याचे कुणाल पेंदोरकर यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
मुनश्यबळाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने किमान वेतन कायदा 1948 आणि किमान वेतन अधिनियम 1963 मधील कलम 19 (4) व नियम 30 नुसार वेतन नोंद ठेवणे गरजेचे असतांना ती विद्यापीठात उपलब्ध नाही. तसेच कंत्राटी कामगार अधिनियम 1970 व महाकंत्राटी कामगार नियम 1971 मधील नियम 25 (2 ) (4 ) क नुसार किमान वेतन अदा करणे अपेक्षीत आहे. परंतू विद्यापीठ प्रशासन व कंत्राटदाराने संगनमताने जाणीवपुर्वक आर्थिक लाभापोटी कामगारांची आर्थिक पिळवणूक करून प्रत्येक कामगारांना 3 ते 4 हजार रूपये वेतन कमी देण्यात येत आहे. या प्रकरणात कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे साटेलोटे असण्याचा आरोपही कुणाल पेंदोरकर यांनी केला आहे. मनुश्यबळाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून कामगारांची आर्थिक पिळवणूक होत असतांना आणि याची प्रशासनाला माहिती असतांना सुध्दा विद्यापीठ प्रशासन मुंग गिळून आहे.
या प्रकरणाची आयुक्तस्तरावर उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, जिल्हाधिकारी गडचिरोली, कामगार आयुक्त मंत्रालय मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.