न्यायासाठी शेतकऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन * शेतीच्या फेरफार प्रकरणात फसवणूक झाल्याचा आरोप

एव्हीबी न्यूज गडचिरोली :-
शेतीच्या फेरफार प्रकरणात फसवणूक करण्यात आल्याचा आरोप अंगारा येथील शेतकरी त्रिभुवन बाळबुध्दे यांनी केला असून प्रशासनाकडून न्याय मिळावा यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
त्रिभुवन बाळबुध्दे यांनी १० जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. मौजा अंगारा येथील तलाठी साजरा क्रमांक १८ अंतर्गत १७ नोव्हेंबर २०१५ रोजी करण्यात आलेल्या फेरफारात फसवणूक झाल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. हा फेरफार दिवाणी व फौजदारी न्यायालय, कनिष्ठ स्तर, कुरखेडा यांनी ९ ऑक्टोबर २०१५ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने करण्यात आला असला, तरी न्यायालयीन आदेशाचा चुकीचा अर्थ लावून फेरफार केल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे.
या संदर्भात अर्जदारांनी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे लेखी निवेदन सादर केले होते. तसेच उपविभागीय अधिकारी, कुरखेडा यांनी २४ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशात, सदर विषयावर निर्णय देणे न्यायसंगत ठरणार नसल्याचे नमूद केले असून, दिवाणी न्यायालयाचा आदेश यापूर्वीच पूर्णतः अंमलात आणण्यात आल्याचे त्यात स्पष्ट केले आहे.
१९ नोव्हेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालय, कुरखेडा येथे अर्ज सादर करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जमीन शाखेकडून दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी अर्ज नस्तीबद्ध केल्याचे पत्र प्राप्त झाल्याने, आपल्याला घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप त्रिभुवन बाळबुध्दे यांनी केला आहे.
अर्जदारांचे म्हणणे आहे की, मौजा अंगारा येथील शेती तसेच सुगनाबाई जनाजी सुकारे यांच्या नावावरील मालमत्ता वडिलोपार्जित असल्याचे दिवाणी न्यायालयाने सिद्ध केल्यानंतरही महसूल प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याची माहिती बाळबुध्दे यांनी दिली