शालेय वेळेत जड वाहतूक पूर्णपणे बंद करा :- आजाद समाज पार्टीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी – जड वाहतूक नियंत्रण, अतिक्रमण हटाव व बायपास रस्ता तातडीने उभारण्याची मागणी

AVB NEWS गडचिरोली :
गडचिरोली शहरातील वाढती जड वाहतूक, हायवेवरील अतिक्रमण आणि सतत होणाऱ्या अपघातांच्या गंभीर पार्श्वभूमीवर आजाद समाज पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ कठोर उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या जीवितास थेट धोका निर्माण करणारी परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, महिला जिल्हाध्यक्ष सोनाशी लभाने व युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांनी शहरातील जीवनमान धोक्यात आल्यानंतरही प्रशासन अद्याप प्रभावी पावले उचलताना दिसत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
मुख्य मागण्या :
१) शालेय वेळेत जड वाहतूक पूर्णपणे बंद करा
सकाळी 8 ते 10 व दुपारी 3 ते 5 या शालेय वेळेत 10 हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक व पालक रस्त्यावर असतात. त्याच वेळी ट्रक–ट्रेलरची वर्दळ तीव्र असल्याने गंभीर दुर्घटनांचा धोका वाढतो.
➡️ म्हणून शालेय वेळेत सर्व जड वाहने शहराबाहेर थांबवावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
२) बेदरकार वेगाने धावणाऱ्या वाहनांवर संयुक्त मोहीम
हायवेवर मोठ्या वेगाने धावणाऱ्या ट्रकांवर कारवाई न होत असल्याने नागरिक दहशतीत प्रवास करत आहेत.
➡️ वाहतूक विभाग व पोलिसांनी संयुक्तरित्या कठोर वेग-नियंत्रण मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
३) अतिक्रमणमुक्त हायवेची त्वरित अंमलबजावणी
हायवे लगत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाल्याने रस्ते अरूंद झाले आहेत.
➡️ संपूर्ण हायवेवरील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करून तातडीने हटविण्याची मागणी पक्षाने केली.
४) स्थायी उपाय म्हणून बायपास रस्ता युद्धपातळीवर सुरू करावा
गडचिरोली शहरातील वाढती जड वाहतूक रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाय म्हणजे बायपास रस्ता.
➡️ बायपास प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून काम तातडीने सुरू करावे, अशी जोरदार मागणी नोंदविण्यात आली.
५) सर्विस रोड व शहरात सुव्यवस्थित पार्किंगची व्यवस्था
हायवेवर सर्विस रोड नसल्यानेच वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्याशेजारी पार्क होतात.
➡️ सर्विस रोडचा आराखडा तयार करावा आणि शहरात स्वतंत्र पार्किंग सुविधा उभाराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
जनतेच्या सुरक्षेसाठी तातडीची कारवाई आवश्यक – आजाद समाज पार्टी
गेल्या वर्षभरात झालेल्या भीषण अपघातांचा उल्लेख करत, “गडचिरोलीतील नागरिकांचा जीव रोज धोक्यात आहे, प्रशासनाने एका क्षणाचाही विलंब न करता कठोर निर्णय घ्यावेत,” अशी भूमिका पक्षाने स्पष्ट केली.निवेदनाची प्रत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनाही देण्यात आली असून, मागण्यांची तात्काळ दखल घेत ठोस उपाययोजना राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.