वाघाने घेतला इंजेवारी येथील महिलेचा बळी ;आरमोरी तालुक्यातील घटना – माकप व शेकापने दिला तिव्र आंदोलनाचा इशारा

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- आरमोरी तालुक्यात वाघ्रबळीच्या घटना वाढत असून वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी डाव्या पक्षांनी केली आहे. परंतू वनविभागाने वाघाचा बंदोबस्त न केल्याने आज 2 डिसेंबर रोजी शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना इंजेवारी येथे घडली. कुंदा खुशाल मेश्राम (62) असे वाघाने ठार केलेल्या महिलेचे नाव आहे.
कुंदा मेश्राम ही महिला आज मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास शेतावर गेली होती. सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास तिचा नातू किसन शेतात गेला असता दिसून आली नाही. आजी शेतात नसल्याने किसन ने घरी येऊन सांगितले. त्यानंतर गावातील नागरिकांसह शेताच्या सभोवताल पाहणी केली असता शेतापासून काही अंतरावर कुंदा मेश्राम यांचा मृतदेह आढळून आला.
आरमोरी तालुक्यात देऊळगाव, इंजेवारी, किटाळी, डोंगरसावंगी परिसरात मागील काही दिवसांपासून वाघांनी माणसांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असून लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा डाव्या पक्षांची वनविभागाला दिला आहे. देऊळगाव येथील मुक्ताबाई नेवारे (७०) व अनुसया जिंदर वाघ (७०) या सरपणासाठी गेलेल्या महिलांना गावाजवळ हल्ला करून वाघाने ठार केल्याची घटना घडली.