भारतीय संविधान जगासाठी प्रेरणादायी “- प्रणोती निंबोरकर यांचे प्रतिपादन – प्रभाग 7 मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- भारतीय संविधान हे आपल्या राष्ट्राचे प्राण आहे. लोकशाहीला दिशा देणारे आणि प्रत्येक नागरिकाचे हक्क सुरक्षित करणारे हे संविधान जगासाठी प्रेरणादायी ठरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह संविधान रचनेतील सर्व महामानवांचे आपण सदैव ऋणी आहोत.” असे प्रतिपादन भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर यांनी केले.
प्रभाग क्रमांक ७ येथील जनसंपर्क प्रचार कार्यालयात भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया असलेल्या भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याने झाली. उपस्थित कार्यकर्ते, नागरिक आणि युवा वर्गाने संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समानता आणि बंधुतेच्या मूल्यांची पुनःप्रतीज्ञा व्यक्त केली.प्रभागातील नागरिकांनीही संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित करत भारताच्या प्रगत, न्याय्य आणि समताधिष्ठित भविष्यासाठी कार्यरत राहण्याची प्रतिज्ञा केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भारतीय बांधवांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.