गडचिरोली जिल्हयातील तिन्ही नगरपालिकेच्या निवडणूकीवर टांगती तलवार ? – 28 नोव्हेंबरच्या सुनावनीकडे लागले लक्ष – राज्यातील 40 नगरपरिषदांमध्ये आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन झाल्याची माहिती

एव्हीबी न्यूज गडचिरोली – राज्यात 246 नगरपालिका व 42 नगरपंचायत निवडणूकीची धामधूम सुरू असतांना राज्यातील 40 नगरपरिषदांमध्ये आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये गडचिरोली जिल्हयातील देसाईगंज, आरमोरी आणि गडचिरोली या तिन्ही नगरपालिकांसह चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरी, बल्लारपूर, नागभिड, चिमूर, भद्रावती, घुग्घूस आणि राजुरा या नगरपरिषदांचा समावेश असल्याचीमाहिती प्राप्त झाली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या आरक्षणासंबंधीच्या याचिकेवर आज (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी सॉलिसिटर जनरल या प्रकरणात वेळ आणखी वाढवून देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायलायने याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी (28 नोव्हेंबर) ठेवली आहे. त्यामुळे सुनावणी लांबल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम असून या सुनावणीकडे राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदारांचे लक्ष लागले आहे
विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा आहे की काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा अनुपात घटनात्मक 50 टक्के मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात आला आहे, जे कायद्याच्या विरोधात आहे. बांठिया आयोगाच्या अहवालाचा संदर्भ घेत आरक्षणाची रचना योग्य पद्धतीने करण्यात आली आहे, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील 40 नगरपरिषदांमध्ये आरक्षणाच्या 50 टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन झाले, याची माहितीही समोर आली आहे.