जिल्हा

इन्स्पायर्ड अवार्ड प्रदर्शनी १७, १८ नोव्हेंबरला गडचिरोलीत;  – चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील २२३ विद्यार्थी प्रतिकृतीसह भाग घेणार  –  शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे यांची माहिती

AVB NEWS गडचिरोली : केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग तसेच राज्य विज्ञान शिक्षण संस्थेमार्फत २०२३-२४ व २०२४-२५ नामांकनाद्वारे निवडप्राप्त २२३ विद्यार्थी व मॉडेलचे जिल्हास्तरीय प्रदर्शन १७ व १८ नोव्हेंबरला अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी शाळा गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या बाजुला नवेगाव चामोर्शी रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व समित्यांची बैठक शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) अमरसिंग गेडाम, हरिष बावनकर, जी. एम. मडावी, प्राचार्य वैशाली मडावी आदी उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता, वैज्ञानिक विचार आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेंतर्गत इयत्ता सहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील समस्यांवर वैज्ञानिक उपायांसाठी कल्पना सादर करण्याकरिता आर्थिक बक्षीस देऊन संशोधनात्मक क्षमतांना चालना देणे हा इन्स्पायर्ड अवार्ड विज्ञान प्रदर्शनीचा मुख्य हेतू आहे. यातून तरुण पिढीला संशोधनाची निवड करण्यासाठी आकर्षित करणे आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचे योगदान वाढविण्यासाठी मदत होते.

मागील दोन वर्षांपासून हे प्रदर्शन होऊ शकले नव्हते. त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासाठी संयुक्तरित्या या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाच्या नियोजनासाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत व नियंत्रण, स्टेज सजावट व सुत्रसंचालन, नोंदणी व प्रदर्शन मांडणी, मुल्यमापण, पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण, भोजन, वाहतूक व वाहनतळ, निवास, शिस्त, आरोग्य व पाणी व्यवस्था, प्रसिद्धी व प्रचार, पत्रिका व प्रमाणपत्र आदी समित्यांचे गठण करण्यात आले आहे. या समितींच्या कार्याचा आज शिक्षणाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन मार्गदर्शन केले. प्रदर्शनाच्या पूर्वी शनिवार, १५ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता विज्ञानदिंडी काढण्यात येणार असून याचा शुभारंभ धानोरा रोडवरील शिवाजी महाविद्यालयापासून होणार असून समारोप जिल्हा परिषद हायस्कूल चामोर्शी रोड येथे केला जाणार आहे. यात शालेय विद्यार्थी, शिक्षक सहभागी होणार आहेत. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन १७ नोव्हेंबरला अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी शाळा गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या बाजुला नवेगाव चामोर्शी रोड गडचिरोली येथे सकाळी केले जाणार असून १८ नोव्हेंबरला निवड केलेल्या २२ विद्यार्थी व प्रतिकृतींना बक्षीसे देऊन गौरविले जाणार आहे.

१७ नोव्हेंबरला सायंकाळी सहभागी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी मिळणार आहे. दोनही दिवस सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांच्या निवासाची व्यवस्था कार्यक्रमस्थळी करण्यात आली आहे. या प्रदर्शनीत गडचिरोली जिल्ह्यातील ४३ व चंद्रपूर जिल्ह्यातील १८० अशा २२३ प्रतिकृतींचा सहभाग राहणार असून गडचिरोली शहरातील विज्ञानप्रेमी विद्यार्थी व जनतेसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. त्यासाठी आठवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी शाळांनी आणून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रती जागृती निर्माण करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे यांनी केले आहे. या नियोजनाची पुढील बैठक १३ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.