अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; नुकसान ग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करून आर्थिक मोबदला देण्यासंदर्भात खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रशासनाला सूचना

AVB NEWS गडचिरोली:
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पिके कापणीस आलेली असतानाच झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली–चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याची मागणी केली आहे.
खासदार किरसान यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया हे जिल्हे कृषीप्रधान असून येथील शेतकरी खरीप हंगामात धान, कपाशी, सोयाबीन, तूर, मका आदी पिकांची लागवड करतात. सध्या ही पिके कापणीस आलेली असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातील पिके भिजून नष्ट झाली आहेत. काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने कापणीचे काम ठप्प झाले असून शेतकऱ्यांचे सर्व श्रम आणि खर्च वाया गेले आहेत.
“शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावला गेला आहे. शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने युद्धपातळीवर पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी,” असे डॉ. किरसान यांनी पत्रात म्हटले आहे.
डॉ. किरसान यांनी शासनाला आवाहन केले आहे की, या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तात्काळ उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष मदत जाहीर करण्यात यावी. शासनाने बाधित शेतकऱ्यांच्या हाती त्वरित आर्थिक सहाय्य पोहोचवून त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.