जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नागरिकांना निवासी पट्ट्यांचे वाटप ; — जानेवारी २०११ पूर्वीचे निवासी प्रयोजनार्थ असलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याची कार्यवाही सुरू

AVB NEWS गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत आयोजित केलेल्या ‘सेवा पंधरवाडा’ उपक्रमादरम्यान “सर्वांसाठी घरे” या मोहिमेला गती देत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी आरमोरी येथील नागरी भागातील ३० व्यक्तींना निवासी प्रयोजनार्थ असलेले पट्टे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत, ०१ जानेवारी २०११ पूर्वीचे निवासी प्रयोजनार्थ असलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याची कार्यवाही सुरू आहे. पट्टे वाटपाच्या या कार्यक्रमापूर्वी आरमोरी तहसिलदार यांचे मार्फत मौजा ठाणेगाव, किटाळी, इंजेवारी, देलनवाडी, मोहझरी ऊर्फ सुकारबोडी, मोहटोला ऊर्फ कुकडी, डारली, देऊळगाव, बोडधाचक व आरमोरी या १० गावांतील एकूण २१९ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात आले आहेत.
पट्टे वाटपाच्या या कार्यक्रमावेळी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान, आरमोरीच्या तहसिलदार उषा चौधरी, तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम, नायब तहसिलदार हरीदास दोनाडकर, ललीतकुमार लाडे, धनराज वाकुळकर, बेबी बरडे यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि मौजा आरमोरी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.