कामगारांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या एमव्हीजी कंपनीला काळया यादीत टाका; अन्यथा ठिय्या आंदोलन छेडणार..! असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांचा आरोग्य प्रशासनाला इशारा

AVB NEWS गडचिरोली :- शहरातील महिला व बाल रूग्णालयात सेवा देणार्या २६ कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करून अन्याय करणाऱ्या एमव्हीजी कंपनीला काळया यादीत टाकावे, अन्यथा ठिया आंदोलन करण्यात येईल, असा इशारा असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री व आरोग्य प्रशासनाला निवेदनातून दिला आहे.
कुणाल पेंदोरकर यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, गडचिरोली जिल्हा सर्वच क्षेत्रात मागासलेला म्हणून ओळखला जातो.
जिल्हयाचे मागासलेपण दूर करून एक विकसीत जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस यांनी जिल्हयाचे पालकमंत्रीपद स्विकारले आहे. मात्र त्यांची प्रशासनावर पकड असल्याचे दिसून येत नाही. जिल्हयातील आरोग्य सेवची स्थिती अद्यापही विदारक आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अधिनस्त असलेल्या गडचिरोली शहरातील महिला व बाल रूग्णालयात मनुष्यबळाचा पुरवठा करणाऱ्या एमव्हीजी कंपनीकडून या रूग्णालयातील २६ कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे. या कर्मचार्यांना हक्काचे वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. वारंवार तक्रार करून सुध्दा आर्थिक हेतूपोटी एमव्हीजी कंपनीवर कोणतीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.
सफाई कामगार यांना किमान वेतन कायदा 1948 नुसार किमान वेतन देणे आवश्यक असतांना एमव्हीजी कंपनीकडून अल्प वेतन देऊन पिळवणूक केली जात आहे. सदर कंपनी कर्मचार्यांचा इफीएफ, एएसआयसी, विमाशुल्काचा भरणा करीत नाही. तसेच वेतन अदा केल्याचे कोणतेही अधिकृत दस्तावेज देत नाही. एक प्रकार सबंधीत कंपनी महिला रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करीत आहे.
माहिती अधिकारा अंतर्गत शल्क भरून माहिती मागितली असता कामातील घोळ लपविण्यासाठी अर्जदारास माहिती दिल्या जात नाही. कामगारांना सामाजिक सुरक्षाविषयक संहिता 2020 नुसार सेवा कंपनीकडून पुरवविल्या जात नसून नियमाचे उल्लंघन केल्या जात आहे. एक प्रकारे एमव्हीजी कंपनीकडून हुकूमशाही पध्दतीने काम सुरू आहे. सदर कंपनीकडून चुकीचे देयक सादर करून अतिरिक्त पैशाची उचल केल्याची माहिती सुध्दा प्राप्त झाली आहे. त्यामुळे एकंदरीत एमव्हीजी कंपनीच्या संशयास्पद कारभाराची चौकशी करण्यात यावी. सदर कंपनीला भविश्यात गडचिरोली जिल्हयात कुठेही काम देण्यात येऊ नये. कारण कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात येत नसल्याने यापुढे सुध्दा कामगाराचीं पिळवणूक होण्याची दाट शक्यता आहे. यापुढे एमव्हीजी कंपनीला मनुष्यबळाचा पुरवठा करण्याचे काम दिल्यास कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाभर काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी आरोग्य प्रशासनाला दिला आहे.