गडचिरोलीच्या मेडीकल कॉलेजबाबत भाजपाच्या विद्यमान -माजी आमदारांमध्ये कुरघोडीचे राजकारण ! जागेची समस्या अद्यापही न सुटल्याने माजी आ. डॉ. देवराव होळींनी व्यक्त केली खंत, तर आ. डॉ. मिलींद नरोटेंची सावध भूमिका
एव्हीबी न्यूज गडचिरोली :- जिल्हयाच्या आरोग्य सुविधेला बळकटी देण्यासाठी शासनाने गडचिरोली येथे मेडीकल कॉलेज मंजूर केले असून यासाठी 471 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतू मेडीकल कॉलेजसाठी जागेचा गुंता अद्यापही सुटलेला नाही. या कॉलेंजसाठी आवश्यक जागेची समस्या अद्यापही सुटलेली नसल्याची खंत भाजपाचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे भाजपाचेच विद्यमान आमदार डॉ. मिलींद नरोटे यांनी जागेची समस्या लवरकच सुटेल असे स्पष्ट करून मेडीकल कॉलेंजच्या जागेबाबात सावध भूमिका घेतली आहे.
मेडीकल कॉलेजच्या जागेबाबत भाजपाच्या विद्यमान व माजी आमदाराचे मत लक्षात घेता मेडीकल कॉलेजच्या जागेचा तिढा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे जिल्हयाचे पालकमंत्री असतांना अद्यापही जागेची समस्या सुटलेली नाही, हे विशेष.
आ. डॉ. नरोटे म्हणतात जागेची समस्या लवकरच सुटेल
वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक जागेची समस्या लवकरच सुटेल, अशी स्पष्टोक्ती आ.डॉ. मिलींद नरोटे यांनी केली आहे. आ. डॉ. नरोटे यांनी स्पष्ट केले आहे की, पावसाळी अधिवेशनादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत गडचिरोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत महाविद्यालयासाठी निधी आणि जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. शासनाने या कामासाठी ₹ ४७१.४१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली असून, लवकरच या महाविद्यालयाच्या बांधकामाची सुरुवात होईल. सध्या प्रस्तावित जागेवरील कृषी महाविद्यालय, शासकीय रुग्णालय आणि नवीन वैद्यकीय महाविद्यालय यांचे अस्तित्व कायम ठेवून जागेची निश्चिती करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी मला संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज प्रस्तावित जागेची पाहणी केली आणि पुढील आठवड्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना गडचिरोलीमध्ये आमंत्रित केले आहे.
वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय या दोन्ही संस्थांचे अस्तित्व कायम राहील याची काळजी घेतली जात आहे. तसेच, कृषी महाविद्यालयाला भविष्यात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल याचीही खात्री केली जात आहे. या कामासाठी आवश्यक असलेली वन विभागाची जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.अशी स्पष्टोक्ती आ.डॉ. मिलींद नरोटे यांनी केली आहे.
प्रस्तावित झालेली जागा कृषी विज्ञान केंद्र व कृषी संशोधन केंद्रास परत देण्याच्या निर्देशाने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामास विलंब :- डॉ. देवराव होळी
माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी स्पष्ट केले आहे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी मंजूर झालेल्या 71.41 एकर जागेपैकी 37.06.एकर जागा कृषी विज्ञान केंद्र व कृषी संशोधन केंद्रास परत देण्याचा निर्देशाने शासकीय महाविद्यालयाचे इमारत बांधकाम रखडले आहे. जागेची सुविधा झाली असताना वनविभागाच्या जागेचा प्रस्ताव देवून होणाऱ्या कामात आडकाठी आणण्याचा दुदैवी प्रयत्न करण्यात आल्यामुळे निधी मंजूर होवूनही वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामास अडथळा येत आहे ही जिल्हावासियासाठी खेदाची बाब असून कृषी विज्ञान केंद्रास जागा परत करण्याचा निर्देश रद्द करून अगोदर मंजूर झालेल्या जागेवरच वैद्यकिय महाविद्यालयाचे ईमारत बांधकाम करण्यात यावे यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी हे पक्ष पातळीवर व शासन दरबारी याबद्दलची वस्तुस्थिती सांगण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. मात्र विना आडकाठी होणाऱ्या कामात काहीही कारण नसताना जागा परत करण्याचा पिलू बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामास अडथळा आणत आहे अशी खंतही माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी व्यक्त केली आहे
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा मिळावी. जिल्ह्यात आरोग्यसुविधेचा अभाव लक्षात घेता जिल्ह्याच्या ठिकाणी शासकिय वैद्यकिय महविद्यालय मंजूर झाल्यास जिल्ह्याच्या अतिदुर्गम व ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देता येईल या उद्देशाने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या मंजूरीसाठी विधानसभेत, शासन दरबारी व प्रसंगी रस्त्यावर आंदोलन करत आग्रही मागणी लावुन धरली. परिणामी सरकारला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रद्द करत गडचिरोलीत 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय मंजूर करावे लागले अशी स्पष्टोक्ती माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी केली आहे