तब्बल 101 नक्षल्यांचा खात्मा करणारे पीएसआय मडावींचा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव* 26 वर्षाच्या सेवाकाळात 58 चकमकीत सहभाग, पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षकापर्यत प्रवास

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- मुंबई पोलीस दलातील एनकाऊंटर स्पेशालीस्टची नावे अनेकांच्या जिभेवर आहेत. मात्र गडचिरोली जिल्ह्यातही असाच जिगरी पोलीस अधिकारी असून पार्टी कमांडर पोलीस उपनिरीक्षक वासुदेव राजम मडावी यांनी आतापर्यंत ५८ चकमकीमध्ये सहभागी होऊन तब्बल १०१ नक्षल्यांना कंठस्नान घातले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याहस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी हे ४ एप्रिल १९९८ मध्ये पोलीस दलात भरती झाले. त्यांनी १०१ नक्षल्यांना कंठस्नान घालण्याबरोबरच ५ नक्षल्यांना अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक वासुदेव राजम मडावी यांनी विशेष अभियान पथकामध्ये २६ वर्षांहून अधिक काळ कर्तव्य बजावले आहे. पोलीस शिपाई ते पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात ०३ वेगवर्धीत पदोन्नती मिळाल्या आहेत,त्यांच्या अभियानातील कौशल्य आणि निर्भय दृष्टिकोनामुळे त्यांना सी-६० पथकामध्ये एक महत्वपूर्ण पार्टीं कमांडर बनवले आहे, ज्याचे नेतृत्व ते ४८ व्या वर्षीही करत आहेत. सर्वात धोकादायक परिस्थितीतही नेतृत्व करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना त्यांच्या सहकारी अधिकारी व अंमलदार तसेच वरिष्ठांकडून देखील आदर आणि प्रशंसा मिळाली आहे. त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक देखील मिळाले आहे. याव्यतिरिक्त, त्यांचे आणखी दोन पोलीस शौर्य पदकासाठीचे प्रस्ताव सध्या विचाराधीन आहेत. यासोबतच त्यांना महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांचेकडून मिळणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देखील प्राप्त झाले आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
