मलेरिया पासून बचावासाठी आरमोरी शहरात तात्काळ फवारणी करावी.: – मिलिंद खोब्रागडे यांची मागणी

AVB NEWS आरमोरी :- गडचिरोली जिल्ह्यात सध्या मलेरिया आणि डेंगू सारख्या घातक आजारांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. दररोज रुग्णसंख्या वाढत असून अनेकांचे मृत्यूही झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरमोरी शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तातडीने मलेरिया व डेंगू विरोधी फवारणी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांनी केली आहे.
शहरातील नाले, गटारे, खुल्या प्लॉट वर साचलेले पाणी व अस्वच्छता यामुळे डासांची उत्पत्ती प्रचंड वाढली असून आजाराचा धोका खूप वाढलेला आहे. यामुळे परिणामी रुग्णसंख्या वाढत असून रुग्णालयात गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागातसुद्धा परिस्थिती चिंताजनक आहे.
शहरात सर्वत्र फवारणी करून डासांचे निर्मूलन केले गेले, तर नागरिकांना या आजाराच्या विळख्यातून मोठा दिलासा मिळू शकतो. याबाबत आरमोरी नगरपरिषद आणि आरोग्य विभागाने तत्काळ पावले उचलून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा खोब्रागडे यांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनिसुद्धा नगरपरिषदेकडे तातडीने डास प्रतिबंधक फवारणी करण्याची मागणी केली आहे. “फवारणी केल्याशिवाय डेंगू-मलेरियाचा फैलाव थांबणार नाही, प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत, असा नागरिकांचा एकमुखी आवाज आहे.
आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की पुढील काही दिवसांत तातडीची उपाययोजना केली नाही, तर रोग नियंत्रणाबाहेर जाऊन मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते. आरमोरीत फवारणी मोहिम त्वरित राबवली नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेला जबाबदार धरून आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल. असा इशाराही मिलींद खोब्रागडे यांनी दिला आहे.