जूनी चव आणि नव्या पिढीचे नाते मजबूत झाले पाहिजे * कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे प्रतिपादन * रानभाजी महोत्सवात रानभाज्यांचे संवर्धन व विपणनावर भर

AVB NEWS गडचिरोली :- निसर्गाने दिलेल्या रानभाज्या चवीला समृद्ध आणि आरोग्यास हितकारक आहेत. आजच्या तरुणाईपर्यंत या रानभाज्यांचे ज्ञान आणि आरोग्यमूल्य पोहचविले पाहिजे . जूनी चव आणि नवी पिढी यांचे नाते मजबूत व्हावे यासाठी महिला बचतगटांनी पुढाकार घेतल्यास, ‘उमेद’मार्फत त्यांना चालना देण्यात येईल. असे राज्यमंत्री श्री जयस्वाल म्हणाले. शेतकरी आणि ग्राहक यांचा थेट संपर्क जुळवण्यासाठी जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री जयस्वाल सोनपूर येथील आत्मा कार्यालयाच्या आवारात आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात बोलत होते. यावेळी आमदार डॉ. मिलींद नरोटे, आत्मा प्रकल्प संचालिका व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर उपस्थित होते.
तत्पूर्वी आज सकाळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या उपस्थितीत रानभाजी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
रानभाज्यांची खरी मजा गडचिरोलीत असून त्यांची मौलिकता नष्ट होऊ नये यासाठी त्यांना राजश्रय देणे गरजेचे आहे, असे मत कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले. यासोबतच त्यांनी गडचिरोलीसारखा मोठा ब्रँड राज्यात नसल्याचे सांगत या जिल्ह्यातील वनउपज विक्रीसाठी ‘गडचिरोली’ या नावाने स्वतंत्र ब्रँड निर्माण करण्याचे आवाहन केले.
तांबडी भाजी, चाकवत, माठ, शेवगा पानं, तिळवणी, कटुरले, वासे यांसारख्या अनेक रानभाज्या या महोत्सवात विक्रीसाठी ठेवल्या होत्या.
यावेळी कृषी उपसंचालक मधुमिता जुमले, कृषी विकास अधिकारी किरण खोमणे, आत्मा च्या समन्वयक अर्चना कोचरे तसेच ग्रामीण भागातील विविध बचतगटाच्या महिला व नागरिक उपस्थित होते.