आरमोरी शहरातील पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा. * काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलींद खोब्रागडे यांची मागणी

AVB NEWS आरमोरी:- शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढत चालला आहे. शहरातील रस्ते, बाजारपेठा, शाळा परिसर आणि वस्ती भागात मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा. अशी मागणी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलींद खोब्रागडे यांनी केली आहे.
नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. “शहरात कुत्र्यांची पकड मोहिम हाती घेऊन त्यांच्यावर तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा इशारा खोब्रागडे यांनी दिला आहे.
अनेकदा लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच पायी जाणारे लोक हें कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरत आहेत. काही ठिकाणी चावा घेण्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे आरोग्याचा धोका देखील वाढला आहे.
सार्वजनिक ठिकाणी कचरा साचल्यामुळे व उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या अन्नाच्या अवशेषांमुळे कुत्र्यांना खाद्य मिळते आणि ते कायमस्वरूपी त्या ठिकाणी थांबतात, अशी माहिती काही स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली. “ पकड मोहीम राबवावी, शहरातील कचरा व्यवस्थापन सुधारण्याची तातडीची गरज आहे.”
शहरातील हा प्रश्न फक्त नागरिकांच्या सुरक्षेपुरता मर्यादित नसून, आरोग्य व स्वच्छतेशी निगडित असल्याने प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. लावारिस कुत्र्यांवर प्रभावी बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषद, पशुवैद्यकीय विभाग आणि स्थानिक पोलीस यांच्यात समन्वय साधून संयुक्त मोहीम राबवावी.
तातडीने उपाययोजना केली नाही, तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा इशारा स्वच्छता अभियंता प्रणाली दूधबळे यांना तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांनी दिला आहे.