९ ऑगस्ट रोजी नागपूरात चले जाओ आंदोलन छेडणार * विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकार्यांची पत्रकार परीषदेत माहिती

AVB NEWS गडचिरोली :- विदर्भ राज्य आंदोलन समिती विदर्भाचे स्वतंत्र राज्य यथाशीघ्र मिळिवण्याच्या दृष्टीने देशातील स्वातंत्र्याच्या लढाईतील घटनेच्या आधारे क्रांती दिनी ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत संविधान चौक नागपूर येथे ‘महाराष्ट्रवादी और विदर्भ विरोधी चले जाओ”निदर्शने आंदोलन’ करणार आहे. या आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या पदाधिकार्यांनी आज ६ ऑगस्ट रोजी स्थानीक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेतून केले.
पत्रकार परीषदेस विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आ.अॅड.वामनराव चटप,जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकुर, जिल्हा समन्वयक अरूण पा. मुनघाटे,दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार,राजकुमार शेंडे,डॉ. निरज खोब्रागडे,विलास रापर्तीवार,घिसु पा. खुणे, हेमंतकुमार मरकाम, मुत्ताजी दुर्गे,मधुकर चिंचोळकर,केवळराम सालोटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परीषदेत माहिती देतांना अॅड. चटप पुढे म्हणाले,महाराष्ट्र सरकारची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू असून राज्याचे महसुली उत्पन्न ५ लाख ६० हजार ९६३ कोटी रुपये असून, ३१ मार्च २०२५ पर्यंत राज्यावर कर्जाचा डोंगर ७ लाख ८२ हजार कोटी व त्या कर्जावर घ्यावे लागणार्या कर्जाचा बोजा ५६ हजार ७२७ हजार कोटी रुपये होता. महाराष्ट्र सरकारने बजेट मंजुरी नंतर घेतलेल्या कर्जाची राशी ही १३ हजार कोटी रुपये असून भविष्यातील राज्याच्या आर्थिक गरजा ‘भगवीण्याकरिता केंद्र सरकारला १ लाख ३२ हजार कोटी रुपयाचे परत कर्ज घेण्यास परवानगी मागितली आहे. ३० सप्टेंबर पर्यंत राज्य सरकारवरील कर्जाचा डोंगर व व्याजाचा बोझा एकूण ९ लाख ८३ हजार ७८७ कोटी रुपये होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार विदर्भाचा ६० हजार कोटी रुपयांचा सिंचनाचा अनुशेष व सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, उद्योग, ऊर्जा, रस्ते, पिण्याचे पाणी, ग्रामविकास, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाचा १५ हजार कोटी रुपयाचा अनुशेष असा एकूण ७५ हजार कोटी रुपयाचा निधी देऊन विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यास असमर्थ आहे.
राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे असल्यामुळे तो अनुशेष भरून निघणे कदापीही शक्य नाही. त्यामुळे विदर्भाची सिंचन क्षमता कदापि वाढू शकत नाही. परिणामी शेतकर्याच्या आत्महत्याचे सुरू असलेले सत्र थांबू शकत नाही. दरडोई उत्पन्न तिळमात्र ही वाढण्याची शक्यता नसल्यामुळे, जटील असलेला कुपोषणाचा व त्यामुळे होणारे गर्भारमाता व बालमृत्यू यांचेही परिणाम कमी होऊ शकत नाही. म्हणून वैदर्भीय जनते करिता ‘विदर्भाचे स्वतंत्र राज्य’ हाच एकमेव पर्याय आहे. म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी तीव्र करण्याकरिता व केन्द्र सरकारने यथाशिघ्र या बाबत निर्णय घ्यावा म्हणून ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रवादी और विदर्भ विरोधी चले जाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचे अॅड. चटप म्हणाले.
१७ ऑगस्टला गोंदिया येथे विदर्भ निर्माण संकल्प मेळावा
विदर्भ राज्याची मागणी पूर्व विदर्भात गावा-गावात पोहचविण्याच्या हेतूने व पूर्व विदर्भात आंदोलनाची धग व तिव्रता वाढविण्याच्या दृष्टीने, पूर्व विदर्भाचा ‘विदर्भ निर्माण संकल्प मेळावा’ रविवार, दिः १७ ऑगस्ट २०२५ रोजी गोंदिया येथील यशोदा सभागृहात दुपारी १२ ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील विदर्भवादी जनतेनी या मेळाव्यात सक्रिय सहभाग नोंदवून मेळावा यशस्वी करावा असे आवाहन विदर्भराज्य आंदोलन समितीने केले आहे.