आदिवासी समाजाने परिवर्तनाची पंचसुत्रे स्वीकारावी :माजी आमदार डाॅ. देवराव होळी

AVB NEWS गडचिरोली,: अविकासामुळे अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या आदिवासी समाजाने आपली पंचसुत्रे स्वीकारून सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद नई दिल्लीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डाॅ. देवराव होळी यांनी रविवार (ता. ३) पत्रकार परीषदेत केले.
पत्रकार परीषदेत माहिती देताना डाॅ. होळी म्हणाले की, आदिवासी समाज बांधवांमध्ये ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापासून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नई दिल्ली जिल्हा शाखा गडचिरोली पंच परिवर्तन सूत्र राबविण्यासाठी पुढाकार घेणार आहे. जगातील आदिवासी बांधवांमध्ये जागरूकता निर्माण करणे, मानवी हक्कांचे संरक्षण व संवर्धन आणि त्यावरील उपाययोजना यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने २३ डिसेंबर १९९४ चा ठराव ४९/२१४ द्वारे ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केले. ९ ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे या दिवसाला आदिवासी समाजामध्ये विशेष महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात जिथे जिथे आदिवासी समाज आहे त्या त्या ठिकाणी हा दिवस जागतिक आदिवासी दिन गोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपणही हा दिवस एक मोठा उत्सव म्हणून साजरा करतो. असे दुसरे काही महत्वपूर्ण दिवसही आहेत जे आपण उत्सवासारखे साजरे करत असतो. परंतु केवळ अशा उत्सवांमधून आपल्या समाजाचा विकास होईल का? त्यातून आपल्या समाजाला योग्य दिशा मिळणार का? आपल्या समाजातील ४५ जमाती एकत्र येतील का? आपला समाज आत्मनिर्भर बनेल का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आजही आदिवासी समाजाबद्दल निरंतर सतत, चिंतन, आचार विचार होऊनही समाजाला योग्य दिशा मिळाल्याचे दिसून येत नाही. आदिवासी समाज आजही भरकटलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. त्यातही आपल्या अनेक समाज सुधारकांनी, विचारवंतांनी समाजाला एकत्रित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि त्यांचे प्रयत्न हे खरोखरच अभिनंदनीय आहेत. परंतु ते प्रयत्न हे अपुरे आहेत. त्याकरिता समाजातील हुशार, विद्वान-बुद्धिवान, सामाजिक विचारवंत, लेखक, इतिहासकार यांना याबाबत पुन्हा नव्याने विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे.
आज आपला समाज अनेक वाईट चालीरीतींच्या मागे भरकटत चालला आहे. अडाणी, अशिक्षितपणा असल्याने आपल्या समाजातील अनेक लोक वाईट चालीरीती व प्रथांचा अंगीकार करीत आहेत. ते आपल्या व्यवहारात आणत आहेत. हे अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे अशा भटकत चाललेल्या समाजाला त्याची जाणीव करून देऊन त्यांना योग्य दिशेला आणण्यासाठी समाजातील अनेक सामाजिक नेतृत्व, विचारवंत मागील अनेक वर्षांपासून सातत्याने समाज प्रबोधनाचे कार्य. करीत आहेत. मात्र तरीही आपल्या समाजाची अवस्था काय आहे याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. त्यामुळे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस या क्रांतिदिनाचे औचित्य साधून पंच परिवर्तन सूत्रांच्या माध्यमातून समाजात नवीन क्रांती घडविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समाजामध्ये ही सूत्र राबविण्याची आवश्यकता आहे. आदिवासी समाज हा या देशाचा गाभा असल्याने ही ५ सूत्रे आपल्या आदिवासी समाजासाठी नवीन नाहीत. ही पंचसूत्री आपल्या समाजाचे मूलमंत्रच आहे. आपल्या चिरंतन संस्कृतीमध्ये जुन्या चालीरीती रूढी परंपरांमध्ये त्याची मुळे आपणास दिसून येतात. मात्र काळाच्या ओघात कुठेतरी त्याचे विस्मरण होत असल्याचे चालले आहे त्याचाच परिणाम आपल्या अडाणी, अशिक्षित, संघटित व एकत्रित नसलेल्या आदिवासी समाज बांधवावर होत असल्याचे दिसून येते. परिणामी आपल्या चांगल्या चालीरीती रूढी परंपरांची जागा वाईट चाली चालीरीती घेत आहेत. समाजात अनेक नवं नवीन कुप्रथा सुरू होत आहेत. काही असामाजिक तत्त्वांच्या माध्यमातून अशा वाईट चालीरीती प्रथांचा समाजात मोठ्या प्रमाणावर राबविल्या जात आहेत. त्यामुळे याला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी पंचसूत्राचे पालन करावे, असेही ते म्हणाले. कुटुंब प्रबोधन- कुटुंब प्रबोधनातून शाश्वत आणि सक्षम कुटुंब व्यवस्था निर्माण करणे, पर्यावरण- व्यक्तीगत पातळीपासून ते सामाजिक पातळीपर्यंत पर्यावरण रक्षण आणि संवर्धन, सामाजिक समरसता- स्नेहमय सामाजिक संबंध जोपासणे, सामाजिक व व्यक्तीगत जीवनातील भेदभाव संपविणे, नागरी कर्तव्य- देशभक्तीसोबत सामाजिक व नैतिक मूल्यांचा अंगीकार करणे, स्व-जागृती- स्व-भाषा, स्व-संस्कृती, स्व-देश, स्वतःच्या परंपरा स्वीकारून त्याला विकसित करणे हीच पंचसुत्रे अंगिकारणे गरजेचे असल्याचे माजी आमदार डाॅ. देवराव होळी म्हणाले. या पत्रकार परीषदेला अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, जिल्हा उपाध्यक्ष वामन जुनघरे, उमेश उईके, सूरज मडावी, मालता पुडो, विद्या दुग्गा, मुकुंदा मेश्राम, येरमे, देवेंद्र राणे आदी उपस्थित होते.