सामाजिक

तेली समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागावे  * तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे यांचे आवाहन

गडचिरोली: –  तेली समाजातील विद्यार्थ्यांनी १० वी व १२ वी मध्ये चांगले गुण प्राप्त करून उच्च शिक्षण घ्यावे व समोर जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करून चांगले यश मिळवून तेली समाजाचा नावलौकिक मिळवावा व त्यासाठी आतापासूनच चांगले मार्गदर्शन घेऊन तयारीला लागावे व पुढील शैक्षणिक जीवनात यश प्राप्त करावे असे आवाहनही यावेळी तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद  पिपरे यांनी केले.

महाराष्ट्र सरकारने श्री संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे त्यामुळे समाजातील गरजू, गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय व बेरोजगार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होणार असून त्यांना स्वतःचा उद्योग उभा करून आपला आर्थिक विकास करण्याची संधी मिळणार असल्याचे यावेळी प्रमोद  पिपरे यांनी सांगितले. सत्कार कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

संताजी सोशल मंडळ गडचिरोली च्या वतीने संताजी भवन सर्वोदय वॉर्ड गडचिरोली येथे १० वी व १२ वी तील तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच तेली समाजातील एम पी एस सी, यू पी एस सी, पी एच डी, एम बी बी एस, नवोदय स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक म्हणून सेवानिवृत्त पोलिस पाटील सुखदेव बारसागडे व समाजसेवक बाळासाहेब बाळेकरमकर यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकार खंडपीठ मुंबईचे अध्यक्ष तथा माजी धर्मदाय आयुक्त समाज भुषण प्रमोदजी तरारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली चे सहाय्यक प्राध्यापक डॉ रामचंद्र वासेकर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरी चे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे, संताजी सोशल मंडळाचे सचिव विठ्ठलराव कोठारे, संताजी स्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रभाकरराव वासेकर, संताजी सोशल मंडळाचे कोषाध्यक्ष राजेश इटनकर, कार्याध्यक्ष गोपीनाथ चांदेवार, तेली सेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तथा इ गवर्नर चे संचालक नरेंद्र तरारे, सुधाकर लाकडे, सुरेश भांडेकर, भगवान ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी माजी धर्मदाय आयुक्त प्रमोदजी तरारे, सहा. प्राध्यापक डॉ रामचंद्र वासेकर , संस्थाध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे व प्रा. देवानंद कामडी यांनी उपस्थित तेली समाज बांधव व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.