शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा; अन्यथा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर ‘घंटा नांद आंदोलन’ महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा इशारा

AVB NEWs गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा हा प्रमुखतः कृषिप्रधान असून जिल्ह्यातील लाखो नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान, कपाशी आदी पिकांची पेरणी केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदतीची आवश्यकता असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.
मागण्यांची तात्काळ पूर्तता न झाल्यास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर 18 जुलै रोजी “घंटा नांद आंदोलन” करण्यात येईल, असा इशारा महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला.
जिल्ह्यातील अनेक भागांत पिके वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी उगम पातळीवरच बी- बियाणे कुजल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशा स्थितीत शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागांत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. तसेच दुबार पेरणीसाठी शासकीय स्तरावर उत्तम दर्जाची बियाणे मोफत पुरवावी, अशी मागणी त्यांनी केली.
त्याचबरोबर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस बी-बियाण्यांचा सुळसुळाट झाल्याचे निदर्शनास आले असून यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. अशा बनावट बियाणे विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशीही काँग्रेसची मागणी आहे.
याशिवाय खतांच्या टंचाईचाही शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अनेक कृषी केंद्रांवर युरिया आणि डीएपी खतांचा तुटवडा आहे. काही ठिकाणी विक्रेते ‘लिंकिंग’ पद्धतीचा अवलंब करून खतासोबत इतर वस्तू खरेदी करण्यास भाग पाडत आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार येतो. ही पद्धत तात्काळ थांबवण्याची आवश्यकता आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या सर्व मागण्यांची तात्काळ पूर्तता न झाल्यास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर “घंटा नांद आंदोलन” करण्यात येईल, असा इशारा महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला.