अखेर धानाचा बोनस मिळाला, महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची शासनाने घेतली दखल * शेतकऱ्यांच्या खात्यात १०४ कोटी रुपयांचा बोनस जमा

एव्हीबी न्यूज गडचिरोली :-
जिल्हयात खरीप हंगामाला सुरवात होऊन सुध्दा शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचनीत सापडले होते. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणावडे यांनी धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा अन्यथा महामंडळ व फेडरेशनच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या मागणीची शासन व प्रशासनाने दखल घेत बोनची रक्कम प्राप्त झाली असून वाटप सुरू आहे.
जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देत १०४ कोटी रुपयांचा बोनस थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला आहे. या बोनसच्या माध्यमातून ४८,००० शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला असून, उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ देण्यात येणार आहे.
बोनस वितरणासाठी शासनाकडून १२० कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून, त्यापैकी १०४ कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. शिल्लक रक्कम सोमवारी बँक खात्यांमध्ये जमा होणार असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील वाटपाला गती मिळणार आहे.शासनाने हेक्टरी २०,००० रुपये या दराने, अधिकतम दोन हेक्टरपर्यंत बोनस देण्याचे नियोजन केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आर्थिक आधार मिळत असून, त्यांचे उत्पन्न व उत्पादकता वाढीस हातभार लागणार आहे. बोनस वाटपामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, उर्वरित रक्कमही लवकरच उपलब्ध होऊन सर्व लाभार्थ्यांना बोनस दिला जाईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.