तब्बल 2 लाख 38 हजार क्विंटल धान नासाडी होण्याच्या मार्गावर ? * गोदामा अभावी खरेदी केंद्राच्या उघडया जागेवर धान पडून * खरीप हंगामातील धानाची भरडाई केवळ 30 टक्केच

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालया अंतर्गत सन 2024- 25 या खरीप हंगामात 7 लाख 45 हजार 558 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी मागील सहा महिन्यात केवळ 30 टक्केच म्हणजे केवळ 2 लाख 83 हजार 391 क्विंटल धानाची भरडाई महामंडळाने केली. तर, तब्बल 2 लाख 38 हजार 304 क्विंटल धान गोदामाअभावी खरेदी केंद्राच्या उघडया जागेवर पडून असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. या धानाची तातडीने भरडाई न झाल्यास पावसामुळे धानाची नासाडी होउुन शासनाचे कोटयावधीचे नुकसान होण्याची शक्यता दिसून येत आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सन 2024-25 या खरीप हंगामात शासनाच्या आधारभूत खरेदी योजने अंतर्गत 25 हजार 824 शेतकऱ्यांकडून 7 लाख 45 हजार 558 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी 2 लाख 83 हजार 391 क्विंटल धानाचे डिओ भरडाईसाठी राईस मिलर्सना देण्यात आले. आजच्या घडीला 1 लाख 34 हजार 88 क्विंटल धान गोदामात, 1 लाख 21 हजार 247 क्विंटल धान शेडमध्ये आणि तब्बल 2 लाख 38 हजार 304 क्विंटल धान गोदामाअभावी खरेदी केंद्राच्या उघडया जागेवर पडून असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
उघडयावरील धान ठेवून गोदाम व शेडमधील धानाची भरडाई !
सन 2024- 25 या खरीप हंगामात गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी 1 लाख 89 हजार 239 क्विंटल धान शेडमध्ये आणि 1 लाख 34 हजार 88 क्विंटल धान गोदामात साठवून ठेवण्यात आले होते, तर तब्बल 4 लाख 22 हजार 270 क्विंटल धान खरेदी केंद्राच्या मोकळया जागेत ठेवण्यात आले होते. उन आणि पावसामुळे धानाची नासाडी होउ नये म्हणून गोदाम व शेडमधील धानाची भरडाई न करता सर्वप्रथम उघडयावरील धानाचे डिओ भरडाईसाठी देणे आवश्यक होते. मात्र उघडयावरील धान ठेउुन 32 हजार 232… क्विंटल धान गोदामातील तर 67 हजार 892 क्विंटल शेडमधील धानाचे डिओ भरडाईसाठी देण्यात आल्याचे दिसून येत असून धान भरडाईच्या प्रक्रियेबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
दरवर्षीच होते धानाची नासाडी, तरी शासन, प्रशासनाकडून दखल नाही !
धान भरडाईस होणारा विलंब आणि गोदामअभावी उघडया जागेवर ताडपत्री झाकून ठेवण्यात आलेले धान दरवर्षी पावसाळयात पावसामुळे भिजतात. त्यामुळे धानाला कोंब फुटून ते खराब होतात. दरवर्षी कोटयावधीच्या धानाची नासाडी होत असतांनाही याबाबीची शासन प्रशासनाकडून गंभिर्याने दखल घेतली जात नसल्याने धान खराब होण्याचा सिलसिला गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. खराब झालेल्या धानाचा लिलाव करून कवडीमोल भावाने हेच धान मिलर्सना विकल्या जाते. यामुळे शासनाला कोटयावधी रूपयाचा फटका बसतो, हे विशेष.