गोदावरी नदीपात्रात सहा मुलांना जलसमाधी * ‘ सहाही मुलांचे मृतदेह सापडले – * मेडिगट्टा लक्ष्मी बॅरेज हद्दीतील दुर्दैवी घटना

AVB NEWS सिरोंचा (गडचिरोली):-
महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागातील गोदावरी नदीपात्रात बुडालेल्या ‘त्या’ सहा मुलांचे मृतदेह अखेर सापडले आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणाच्या हद्दीतील मेडीगड्डा धरणाजवळ गोदावरी नदीपात्रात आंघोळीसाठी उतरलेली ६ मुले ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास बुडाली होती. ही सहाही मुले तेलंगणाची आहेत.
महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवरील मेडीगड्डा धरणाजवळून गोदावरी नदी वाहते. या नदीच्या पलीकडे तेलंगणाच्या हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ असलेल्या नदीच्या पात्रात आंघोळीसाठी सहा मुले गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने ती नदीपात्रात बुडाली.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र शनिवारी यापैकी कुणाचाही थांगपत्ता लागला नव्हता. आज रविवारी तब्बल ७ तासाच्या शोध मोहिमेनंतर सर्व सहाही जणांचे मृतदेह हाती लागले. मृतकांमध्ये पत्ती मधुसूदन (१५), पत्ती मनोज (१३), कर्नाळा सागर (१४), तोगरी रक्षित (११) सर्व रा. आंबटपल्ली, जि. जयशंकर भुपालपल्ली( तेलंगणा), पांडू (१८) व राहुल (१९) दोघेही रा. कोरलाकुंडा जि. जयशंकर भुपालपल्ली यांचा समावेश आहे. या घटनेनंतर मुलांच्या नातेवाईक व कुटुंबीयांनी गोदावरी नदीकाठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नायक यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.
