जिल्हा

‘ दर्शन देगा देगा देवाभाऊ’….. मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणविसांच्या गडचिरोली भेटीसाठी काँग्रेस करणार महायज्ञ  * 6 जून रोजी सेमाना देवस्थानात महायज्ञ

AVB NEWS गडचिरोली :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली सारख्या मागास आणि नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून स्वतःची प्रशंसा करून घेतली. मात्र, आजतागायत त्यांनी येथील सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कधीही संवाद साधलेला नाही. त्यांची जिल्ह्याला भेटही दुर्मिळ झाली आहे. असा आरोप करत जिल्हा काँग्रेसने ६ जून रोजी सेमाना देवस्थानात महायज्ञाचे आयोजन केले आहे. यामध्यमातून ते फडणवीसांना जिल्ह्यात येऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी गळ घालणार आहेत.

मागील तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रानटी हत्ती, वाघ, अस्वल यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.   अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहेत. शेतीला २४ तास वीजपुरवठा मिळत नाही. अद्याप शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही. जिल्ह्यात असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना पालकमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, त्यांना जिल्ह्यासाठी वेळ नाही. त्यामुळे प्रशासनावर कुणाचाही वचक राहिलेला नाही. वारंवार आंदोलन, मागण्या करूनही सर्वसामान्यांचे प्रश्न जैसे थे असल्याने काँग्रेसकडून ६ जून रोजी शहरातील सेमाना देवस्थानात महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पालकमंत्री फडणवीस यांनी लवकरात लवकर जिल्ह्यात येऊन मागण्यांची दखल घ्यावी, अशी गळ आम्ही घालणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बामनवाडे यांनी पत्रकाच्या माध्यमातून कळवले आहे. दरम्यान, समाज माध्यमावर काँग्रेसच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची जोरदार चर्चा आहे.

प्रमुख मागण्या

वन्यप्राणी, अवकाळी पाऊस आणि विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांना कर्जमाफी देण्यात यावी. शेकडो अपघातास कारणीभूत लोहखनिजाच्या बेदरकार वाहतुकीवर आळा घालण्यात यावा. वाळूचा काळाबाजार थांबवून घरकुलधारकांना वाळू उपलब्ध करून द्यावी. उद्योगाच्या नावाखाली घेण्यात येणाऱ्या शेतजमिनीला योग्य भाव देण्यात यावा. कंत्राटदारांचे थकीत देयके देण्यात यावी. रोजगारहमीची थकीत मजुरी देण्यात यावी. दरवर्षी पावसाळ्यात शेकडो गावांचा संपर्क तुटतो. यासाठी अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम वेळेत पूर्ण करावे. जिल्ह्यातील अंतर्गत आणि राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करावी. आरोग्य सुविधा बळकट करावी. उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार देण्यात याव्या आदी मागण्या काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.