राजकीय

गडचिरोली भाजपात खांदेपालट; आता कुणबी ऐवजी तेली समाजाला प्रतिनिधीत्व * जिल्हाध्यक्षपदी प्रा. रमेश बारसागडे यांची नियुक्ती, भाजपाचे पुन्हा ओबीसी कार्ड * पक्षाची विस्कळीत झालेली स्थिती सुधारण्याचे बारसागडे यांच्या समोर आवाहन

 

 

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- राज्यात भाजपाच्या संघटनपर्व अभियाना अंतर्गत राज्यात जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष बदलण्यात आले असून गडचिरोली जिल्हा भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी ओबीसी प्रवर्गातील तेली समाजातील भाजपाचे कार्यकर्ते प्रा. रमेश बारसागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोलीत पुन्हा ओबीसी कार्ड वापरले आहे. यापुर्वी कुणबी समाजातील भाजपाचे कार्यकर्ते प्रशांत वाघरे यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली होती. बारसागडे यांची शांत व संयमी नेतृत्व म्हणून ओळख आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणूकीत भाजपाची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. तसेच पक्षातील गटबाजी हा सुध्दा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन पक्षाची बांधणी व संघटनशक्ती वाढविण्याचे आवाहन प्रा. बारसागडे यांच्या समोर राहणार आहे.

रमेश बारसागडे यांची राजकीय सुरवात राष्टवादी कॉंग्रेस मधून झाली. त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यांनी कुनघाडा रै. जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडणूक लढवून ते विजयी झाले. तसेच जिल्हा परिषदेचे कृषी सभापतीपदही भूषविले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तिन महिन्यावर येउुन ठेपल्या आहेत. या निवडणूका प्रा. बारसागडे यांच्या नेतृत्वात लढल्या जाणार आहेत. या निवडणूका जिंकण्याचे आवाहन त्यांच्यासमोर राहणार आहे. वर्षभरापुर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होेता, तर विधानसभा निवडणूकीत सुध्दा भाजपाला अपेक्षीत यश संपादन करता आले नाही. आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. तर गडचिरोली विधानसभा निवडणूकीच्या अटीतटीच्या सामन्यात भाजपाचे उमेदवार डॉ. मिलींद नरोटे यांना निसटता विजय मिळाला. विशेष म्हणजे भाजपाचे उमेदवार डॉ. नरोटे यांना चामोर्शी तालुक्यातील बंगाली व तेली समाज बहुल गावातील मतदारांमुळे विजय प्राप्त करता आला.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.