एव्हीबी न्यूज गडचिरोली :-
निवडणूक जाहीरनाम्यात राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अजूनही त्या आश्वासनांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे किसान ब्रिगेड च्या वतीने आज 14 मे रोजी राज्यभर किसान कर्जमुक्तीचे अर्ज तहसील कार्यालयात सादर करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात किसान कर्जमुक्ती चे अर्ज घेऊन तहसील कार्यालयावर धडक दिली व आपले अर्ज सादर केले.किसान ब्रिगेडच्या पुढाकाराने व लोकनायक शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे यांच्या नेतृत्वाखाली ‘शेतकरी कर्जमाफी योजना अभियान’ गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी आदी तहसील अधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकरी कर्जमाफी अर्जासह दाखल झाले. या वेळी कार्यालय परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेतकऱ्यांनी स्वतः फॉर्म भरले आणि शासनाकडे कर्जमाफीसाठी जोरदार मागणी केली. शेतकऱ्यांनी मतदान केले, पण आता आमच्या कर्जमाफीबाबत सरकार गप्प का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. किसान ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे अर्ज वाटप करण्यात आले असून, संपूर्ण विदर्भात तालुका व जिल्हा स्तरावर असे अर्ज तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालयात सादर करण्याचे अभियान चालवले जात आहे. यासाठी हजारो शेतकरी स्वयंस्फूर्तीन पुढे सरसावले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून सातत्याने होत आहे.
ही लढाई येथे थांबणार नाही : पोहरे
शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे यांनी स्पष्ट केले की, ही लढाई येथे थांबणार नाही. सरकारने जर शेतकऱ्यांचे ऐकले नाही, तर आम्ही न्यायालयीन लढाई देखील उभारू. तसेच, महायुती सरकारने निवडणुकीत दिलेली वचने विसरू नयेत, अन्यथा शेतकरी आता गप्प बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
—————————————
Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.