वैनगंगेत बुडालेल्या मेडीकल कॉलेजच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले !

एव्हीबी न्यूज गडचिरोली:- चंद्रपुर गडचिरोली मार्गावरील वैनगंगेच्या नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेले गडचिरोली मेडीकल कॉलेजचे 3 विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना काल 10 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. आज रविवारी त्या विद्यार्थ्यांचे मृतदेह नदीपात्रात सापडले. मृतदेहाचे सावली येथील रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अविनाश टेकाडे यांनी दिली.
गोपाल गणेश साखरे (20 ) रा. चिखली जि.बुलढाणा, पार्थ बाळासाहेब जाधव (20 )रा. शिर्डी जि. अहिल्यानगर व स्वप्निल उध्दवसिंग शिरे( 20 )रा. छत्रपती संभाजीनगर अशी मृतकांची नावे आहेत. तिघेही जण गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर व गडचिरोली येथून बचाव पथक घटनास्थळी पोहचून शोधकार्य सुरू केले. परंतू काल शनिवारी एकाचाही शोध लागला नाही. रात्री अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. आज रविवारी सकाळी शोधकार्य सुरू केल्यानंतर तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले.