अमोल मारकवार यांची अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिल सदस्यपदी निवड * गडचिरोलीतील जमीन अधिग्रहण व प्रस्तावित लोहखाणी रद्द करण्याचा किसान सभेच्या राज्य अधिवेशनात ठराव

AVB NEWS गडचिरोली :- अखिल भारतीय किसान सभेचे २४ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन दि. ६ ते ८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान कोल्हापूर येथे संपन्न झाले. या अधिवेशनात महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. या अधिवेशनात कॉ. अमोल मारकवार यांची अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिल सदस्यपदी निवड करण्यात आली.
गडचिरोलीच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण ठराव
अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्यातील भेंडाळा, जयरामपूर, येनापूर आणि गुरवडा येथील जमीन अधिग्रहण रद्द करण्यात यावे, तसेच गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या लोहखाणी रद्द करण्यात याव्यात, असा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी आणि स्थानिक जनतेच्या जमिनी व उपजीविकेवर परिणाम करणाऱ्या या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची भूमिका किसान सभेने या ठरावातून स्पष्ट केली. जमीन, जंगल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील स्थानिक जनतेचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार अधिवेशनात व्यक्त करण्यात आला.अधिवेशनात कॉ. यशवंत झाडे (वर्धा) यांची राज्य अध्यक्षपदी, तर कॉ. उमेश देशमुख यांची राज्य सचिवपदी निवड करण्यात आली.
या अधिवेशनाला अखिल भारतीय किसान सभेचे नेते कॉ. अशोक ढवळे, कॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले, माजी आमदार जे. पी. गावीत यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित होते.