काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांची घोषणा ; पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ‘एआय डिस्ट्रिक्ट हब’ स्थापन करणार!
गडचिरोतील सभेत काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांची घोषणा

गडचिरोली, : गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्ह्यातील पदवीधर युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ‘एआय डिस्ट्रिक्ट हब’ची स्थापना करण्यावर आपण भर देणार आहोत, असे प्रतिपादन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले.
पदवीधरांच्या कौशल्यविकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांना रोजगारक्षम बनविणे, हेसुद्धा आपले मिशन असल्याचे त्यांनी गडचिरोली येथे आयोजित आढावा बैठकीत सांगितले.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट), विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ (विमाशि) तसेच विविध शिक्षक व कर्मचारी संघटना, महाविकास आघाडीच्या वतीने अभिजित वंजारी निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथे आयोजित सभेत संघटनात्मक तयारी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि आगामी प्रचाराचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पदवीधरांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने डॉ. श्रीकांत जिचकार पदवीधर भवन उभारण्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. पदवीधरांना मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांची तयारी, विविध उपक्रम आणि संघटनात्मक संवादासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या दृष्टीने पदवीधर भवनाची संकल्पना उपयुक्त ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्यविकास आणि आवश्यक शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून पदवीधरांना प्रगतीच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर वंजारी यांनी भर दिला.
या सभेला नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव दुष्यंत किरसान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष अतुल पवार, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश इतकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कोशिम, प्राचार्य समशेर खान पठाण आणि प्राचार्य मनोहर पाटील पोरेडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी संपर्कयंत्रणा उभारणे, शिक्षक व कर्मचारी संघटनांशी समन्वय वाढविणे आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने निवडणुकीच्या कामाला लागणे, यावर भर देण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधरांच्या अपेक्षा आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन निवडणूक प्रचाराची दिशा ठरविण्याबाबतही चर्चा झाली.