जिल्हा

नवरात्रीत मांसविक्री बंद ठेवण्यास मुस्लीम बांधवांचे सहकार्य; धार्मिक सौहार्दाचा आदर्श  * उदय धकाते यांच्या पुढाकारातून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

AVB NEWS गडचिरोली/ प्रतिनिधी :-
नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मटण व चिकन विक्रीची दुकाने घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला शहरातील मांसविक्रेत्यांसह मुस्लीम बांधवांनीही स्वेच्छेने सहकार्य दिले आहे. या उपक्रमातून गडचिरोलीत हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जात आहे.

शहरात दरवर्षी नवरात्री उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाला सामाजिक ऐक्याची जोड मिळावी, या उद्देशाने मागील वर्षापासून नवरात्रीदरम्यान मांसविक्री बंद ठेवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. यंदाही या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला असून, शहरातील मांसविक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवण्यास सहमती दर्शविली आहे.

“धार्मिक परंपरेसोबत सामाजिक एकोपा जपणे महत्त्वाचे”

याबाबत बोलताना उदय धकाते म्हणाले की, नवरात्री हा मातृशक्तीच्या उपासनेचा आणि एकतेचा उत्सव आहे. या काळात मांसविक्री बंद ठेवण्याच्या उपक्रमातून धार्मिक परंपरांचा आदर राखण्यासोबतच परस्पर सन्मान आणि सामाजिक बंधुभावाची मूल्येही जपली जातात. हिंदू-मुस्लीम बांधवांनी दिलेले सहकार्य हे गडचिरोलीच्या सौहार्दपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवते.

शहरातील सर्व नागरिकांच्या धार्मिक भावना जपल्या जाव्यात आणि उत्सव शांततेत व सलोख्याच्या वातावरणात साजरा व्हावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही धकाते यांनी केले. शहरात कुठेही मांसविक्री सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित भागातील दुर्गा व शारदा उत्सव मंडळांनी दुकानदारांशी संवाद साधून दुकाने बंद ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

उदय धकाते यांच्या पुढाकाराला मुस्लीम बांधवांनी दिलेल्या सहकार्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने धार्मिक सलोखा, परस्पर आदर आणि सामाजिक एकतेचा संदेश अधोरेखित झाला आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.