जिल्हा

गडचिरोलीतील आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा ; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माता व बाळ दगावले..!  * महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांचा आरोप   * जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी *  आरोग्य उपसंचालकांना निवेदन देऊन प्रकरणाकडे वेधले लक्ष

AVB NEWs गडचिरोली  :- राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या गडचिरोली जिल्हयात आरोग्य यंत्रणा पुरती ढासळली असून आरोग्य सेवेचे बोजवारा उडाला आहे. प्रसुतीपुर्व उपचारात हलगर्जीपणा करण्यात आल्याने नवजात बालकासह गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोषी डॉक्टरांना निलंबीत करण्यात यावे आणि आरोग्य यंत्रणा अनियंत्रीत करणाऱ्या गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकीत्सक यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी आरोग्य उपसंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कुणाल पेंदोरकर यांनी नागपूर येथील आरोग्य उपसंचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील गरोदर मातेला 23 ऑगस्ट 26 रोजी प्रसुतीसाठी चामोर्शी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या रूग्णालयात एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. परिचारीकांनी डॉक्टरांना पफोन करून माहिती दिली. मात्र तब्बल दीड दोन तासांनी डॉक्टर उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी प्रसुतीसाठी आलेल्या महिलेची तपासणी केली. मात्र डॉक्टरांनी कोणताही औषधोपचार न करता आम्ही इमर्जन्सी सिजर शस्त्रक्रिया करीत नाही, तुम्ही गडचिरोलीला ‘रेफर’ करा असे उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. रूग्णाच्या नातेवाईकांनी चामोर्शी उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांना तुम्ही इथेच ‘सिजर’ करा विनंती केली. मात्र डॉक्टरांनी यास नकार देत तुम्ही गडचिरोलीलाच घेऊन जा तिथे नॉर्मल प्रसूती होऊ शकते असे सांगून रूग्णवाहीकेने गडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात पाठविले.

महिला व बाल रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केल्यानंतर कोणतीही पुर्व तपासणी न करता सरळ शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आली. प्रसुती नंतर मृत पावलेले बाळ जन्माला आले मात्र मातेची प्रकृती गंभिर असल्याने सांगून जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आल्यानंतर मातेचा मृत्यू झाला. माता व बाळाच्या मृत्यूला सर्वस्वी आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे. महिला व बाल रूग्णालयात सर्व सोयी सुविधा असतांना मातेला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले, प्रसुती पुर्वी मातेची तपासणी का करण्यात आली नाही, चामोर्शी उपजिल्हा रूग्णालयात वेळेवेर डॉक्टर का उपस्थित होऊ शकले नाही, या सर्व बाबीची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी कुणाल पेंदोरकर यांनी आरोग्य उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा शल्यचिकीत्सकांची तातडीने हक्कालपट्टी करावी

गडचिरोली येथील जिल्हा शल्यचिकीत्सक येथे रूजू झाल्यापासून त्या वादग्रस्त ठरल्या आहेत. त्यांच्या विरोधात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी सुध्दा तक्रारी केल्या आहेत. जिल्हा शल्यचिकीत्सकांचे आरोग्य प्रशासनावर नियंत्रण नाही. त्यांचे जिल्हयातील उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी योग्य समन्वय नाही. त्यांच्या मनमर्जी कारभारामुळे जिल्हयातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे. जिल्हा शल्यचिकीत्सकांचे तालुका आारोग्य अधिकाऱ्यांशी पटत नाही. याचा परिणाम रूग्णसेवेवर होत आहे. आतापर्यंत अनेक कंत्राटी डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. या सर्व प्रकाराला जिल्हा शल्यचिकीत्सक जबाबदार असून त्यांची गडचिरोलीतून हक्कालपट्ठी करण्यात यावी, अशी मागणी कुणाल पेंदोरकर यांनी आरोग्य उपसंचालकांकडे केली आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.