जिल्हा

आदिवासी विद्यार्थी  संघाची आश्रमशाळा बंद आंदोलनाची हाक ! आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील दर्जा सुधारण्याची मागणी

AVB NEWS गडचिरोली : आश्रमशाळा, वसतिगृहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघ–विदर्भ नागपूरच्या गडचिरोली जिल्हा शाखेने 25ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील संपूर्ण आश्रमशाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी संघाने केली आहे. याबाबत संघाच्या वतीने राज्यपाल, मुख्यमंत्री, सहपालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाची नोटीस देण्यात आली आहे.

आदिवासी विद्यार्थी संघाच्या म्हणण्यानुसार, आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्पदंश, विषबाधा, मलेरिया तसेच अन्य कारणांमुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असल्याचा दावा संघाने केला असून, या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

१५ मागण्यांसाठी आंदोलन

आदिवासी विद्यार्थी संघाने आपल्या निवेदनातून एकूण १५ मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत. त्यामध्ये आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचा राजीनामा घेण्याबरोबरच आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

वसतिगृहांसाठी लागू असलेली डीबीटी योजना बंद करून पूर्वीची मेस पद्धत सुरू करावी, शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमधील भोजन व्यवस्था सुरळीत करावी, तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची नियमित तपासणी करून शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आदिवासी विद्यार्थी संघाने संघाने केली आहे.

जपतलाई व कोटगुल प्रकरणांचाही उल्लेख

निवेदनात कोटगुल येथील मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदत देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदत देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एकलव्य, केंद्रीय विद्यालये आणि आश्रमशाळांच्या इमारत बांधकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या कामांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघाने केली आहे. निकृष्ट दर्जाचे ड्रेस पुरवठा करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात आहे.

सिरोंचा वसतिगृह सुरू करण्याची मागणी

सिरोंचा येथील आदिवासी मुलींचे वसतिगृह तात्काळ सुरू करावे, शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांची नियमित तपासणी करावी आणि न्यूक्लिअस बजेटच्या तरतुदीत वाढ करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी संघाने केली आहे.

अधिकाऱ्यांच्या भेटी बंधनकारक करण्याची मागणी

प्रत्येक आश्रमशाळा आणि वसतिगृहाला आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी वर्षातून किमान एकदा, आयुक्तांनी दोनदा आणि अपर आयुक्तांनी तीनदा भेट द्यावी, तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांनी दर महिन्याला किमान पाच शाळांना भेट देणे बंधनकारक करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांवर निर्बंध आणणारा संबंधित शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणीही संघाने केली आहे.

या सर्व मागण्यांसाठी २४ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण आश्रमशाळा बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे आदिवासी विद्यार्थी संघाने आपल्या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे. आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी शासन-प्रशासनाची राहील, असा इशाराही संघाने दिला आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.