जिल्हा

कोटी–कोरणार पूल भ्रष्टाचार प्रकरणी आजाद समाज पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  घेराव आंदोलन  * दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी 

AVB NEWS गडचिरोली : कोटी–कोरणार पुलिया दुर्घटना व त्यामागील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषींवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी आजाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातून शेकडो नागरिक सहभागी झाले. आंदोलनाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आदिवासी विकास युवा परिषद आणि बिरसा ब्रिगेड यांनी सक्रिय पाठिंबा देत सरकार व प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

आंदोलनादरम्यान आजाद समाज पार्टीने मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत प्रशासनाच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. “ज्या पुलियाचे उद्घाटन स्वतः मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री करतात, त्याच पुलियामध्ये काही वर्षांतच निकृष्ट बांधकामाचा प्रकार उघडकीस येतो, पुलिया दुर्घटनाग्रस्त होते आणि घटना होऊन 20 दिवस उलटूनही जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होत नाही; मग मुख्यमंत्री नेमके कुणाला संरक्षण देत आहेत?” असा संतप्त सवाल करण्यात आला.

“जपतलाई आश्रमशाळेच्या दुर्घटनेत 24 तासांत कारवाई होते; मग कोटी–कोरणार पुलिया प्रकरणात 20 दिवस उलटूनही कारवाई का नाही?” असा सवाल करत, संबंधित संस्था काँग्रेसशी संबंधित असल्यामुळे सरकारने वेगळी भूमिका घेतली का, असा खोचक प्रश्नही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. “सरकारचा हा दुहेरी न्याय आहे का? भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरकारचा राजकीय पाठिंबा आहे का?” असा थेट सवाल आजाद समाज पार्टीने केला.

जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. परंतु जिल्हाधिकारी यांनी अद्याप स्वतः कोणताही अहवाल, प्रस्ताव किंवा पत्र व्यवहार सरकारशी केलेल्या नाही असे सांगितले. उत्तर देण्यास टाळाटाळ केली. ठोस कोणतेही उत्तर जिल्हाधिकारी यांनी दिले नाही. पण आंदोलनानंतर आता वरिष्ठ प्रशासनाशी चर्चा करून अहवाल देतोय असे सांगितले. जिल्हाधिकारी यांना आंदोलकांनी चांगलेच घेरले.

आंदोलनस्थळी “पालकमंत्री राजीनामा द्या”, “अधीक्षक अभियंत्यांना निलंबित करा”, “भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलनाच्या माध्यमातून कोटी–कोरणार पुलिया दुर्घटना प्रकरणात अधीक्षक अभियंत्यांना तात्काळ निलंबित करावे, संबंधित कंत्राटदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिचा परवाना रद्द करावा, अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यकाळातील 550 कोटी रुपयांच्या कामांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करावी, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी तसेच स्थानिक कंत्राटदारांना कामांमध्ये प्राधान्य द्यावे, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या.

आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वी सादर केलेल्या अहवालांवरच गंभीर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर हल्लाबोल केला. “पूल कोसळल्यानंतर केवळ कागदी अहवाल तयार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही. जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदार दोघांनाही कायद्याच्या चौकटीत आणलेच पाहिजे. कारवाई होत नसेल तर जनतेच्या न्यायासाठी आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

या आंदोलनाचे नेतृत्व आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, हंसराज उराडे, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे आणि बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश वरखडे यांनी केले.

आंदोलनास आजाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत सातार, चेतन काटेंगे, महासचिव अंकुश कोकोडे, नागसेन खोब्रागडे, धनराज दामले, प्रकाश बन्सोड, किशोर उसेंडी, सावन चिकराम, प्रेम मडावी, शोभा खोब्रागडे, वनिता उसेंडी, सविता बांबोळे, मंगेश बन्सोड, सतीश दुर्गमवार, शुभम पाटील आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

कोटी–कोरणार पुलिया प्रकरणातील दोषींवर ठोस कारवाई होईपर्यंत हा लढा थांबणार नाही. जनतेच्या पैशांचा हिशोब जनतेला द्यावाच लागेल, असा इशारा आजाद समाज पार्टी व सहभागी संघटनांनी प्रशासनाला दिला.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.