जिल्हा

पदवीधरांच्या प्रश्नांसाठी सक्षम नेतृत्वाला साथ द्या – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  * गडचिरोलीतील पदवीधर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार . सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या प्रचारार्थ गडचिरोली येथील आरमोरी रोडवरील सुमानंद सभागृहात पदवीधर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला महायुतीचे विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. पदवीधरांचे प्रश्न, रोजगार, शिक्षण आणि विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करत उमेदवाराच्या प्रचाराला यावेळी चालना देण्यात आली.

पदवीधरांच्या प्रश्नांसाठी सक्षम नेतृत्वाला साथ द्या – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मेळाव्याला संबोधित करताना राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचे उमेदवार सुधाकरजी कोहळे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. पदवीधरांच्या समस्या समजून घेऊन त्या प्रभावीपणे मांडणारे आणि त्यांच्या निराकरणासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व पदवीधर मतदारसंघाला आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सुधाकरजी कोहळे यांना दिलेले मत हे विकासाच्या भूमिकेला दिलेले मत असल्याचे सांगत त्यांनी पदवीधरांनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

सन २०२० मधील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा संदर्भ देताना बावनकुळे यांनी त्या वेळच्या राजकारणावर टीका केली. विरोधकांकडून जातीयवादी व जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

आपल्या ३४ वर्षांच्या राजकीय कार्यकाळाचा उल्लेख करताना बावनकुळे म्हणाले की, राजकारण हे जाती-पातीच्या चौकटीत मर्यादित न राहता समाजातील सर्व घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी असले पाहिजे. आपण कधीही जातीयवादी राजकारण केले नसल्याचे सांगत सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकास साधण्याची भूमिका त्यांनी मांडली.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि धान उत्पादकांच्या प्रश्नांवर भाष्य करताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात आला असून, यंदाही धानाचा बोनस देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सर्वांगीण विकासासह शेतकरीहिताच्या निर्णयांना प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची असून, पदवीधरांच्या अपेक्षा आणि प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचे आवाहन करत सुधाकरजी कोहळे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले.

पदवीधरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणजे सुधाकरजी कोहळे – डॉ. अशोक नेते

यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी पदवीधर मतदारांना संबोधित केले. पदवीधर मतदारसंघ हा सुशिक्षित, अभ्यासू आणि जाणकार मतदारांचा मतदारसंघ असून, पदवीधरांच्या अपेक्षा, समस्या आणि मागण्या समजून घेऊन त्या योग्य व्यासपीठावर प्रभावीपणे मांडणारे नेतृत्व आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्याकडे पदवीधरांच्या प्रश्नांवर काम करण्याची क्षमता असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी मांडली. पदवीधरांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील अडचणी, रोजगाराच्या संधी आणि तरुणांच्या भवितव्याशी निगडित विषयांना प्राधान्य मिळणे गरजेचे असल्याचे डॉ. नेते यांनी नमूद केले. पदवीधरांच्या हितासाठी महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची भूमिका स्पष्ट करत त्यांनी सुधाकरजी कोहळे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

या मेळाव्याच्या मंचावर माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ तथा कीर्तिकुमार भांगडिया, भाजपाचे नेते संजयजी कुटे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी आमदार तथा आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर जिल्हा प्रमुख प्रशांतजी वाघरे, सहकार महर्षी अरविंदजी सा. पोरेड्डीवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, शिवसेनेचे नेते संदीप ठाकूर, भाजपा नेत्या डॉ. चंदाताई कोडवते आणि आरटीआयचे नेते मेघश्याम घुटके यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, अनिल पोहनकर, सुरावार सर आणि रिंकू पापडकर यांच्यासह महायुतीच्या विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने पदवीधर मतदार उपस्थित होते.

पदवीधरांच्या प्रश्नांवर विचारविनिमय, शिक्षण व रोजगाराच्या विषयांना प्राधान्य आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची दिशा यांमुळे हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरला. या माध्यमातून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला अधिक गती देण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.