अखेर टेंभा ग्रामपंचायती मधील भ्रष्टाचाराची चौकशी! * अरविंद कात्रटवार यांच्या निवेदनाची प्रशासनाकडून दखल * चौकशीसाठी चार सदस्यीय समिती

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत टेंभा ग्रामपंचायती मध्ये साहित्य खरेदीच्या नावाखाली करण्यात आलेल्या लाखोच्या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांच्यासह टेंभावासीयांनी केली आहे. सदर मागणीच्या अनुषंगाने ५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन आठवडभरात कारवाईची मागणी जोर लावून धरण्यात आली या मागणीची प्रशासनाने दखल घेत चौकशी समिती नेमली आहे. समिती आज 9 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायती मध्ये जाउुन चौकशी करणार आहे.
गटविकास अधिकारी अनिकेत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून समिती मध्ये सहाय्य गटविकास अधिकारी एल.के बेडके, विस्तार अधिकारी व्ही.जी.देव्हारे, विस्तार अधिकारी जे.डी.ठाकरे यांचा समावेश आहे.
छत्रपती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टेंभा ग्रामपंचायतीला केंद्र व राज्य शासनाकडून विकास कामांसाठी निधी प्राप्त होतो. परंतू कुठलीही कामे न करता शासकीय निधीची अफरातफर करण्यात आली आहे. टेंभा ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेंभा यांना कोणत्याही साहित्याचा पुरवठा केलेला नाही. बोगस साहित्य खरेदी दाखवून लाखो रूपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. टेंभा ग्रामपंचायतीने टेंभा जिल्हा परिषद शाळेला कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्राजेक्टर, स्मार्ट टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरो या साहित्याचा पुरवठा केला असल्याचे दाखविले आहे. परंतू प्रत्यक्षात शाळेला वरील साहित्याचा पुरवठा विविध माध्यमातून झालेला असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणतीही वस्तू शाळेसाठी खरेदी करण्यात आलेली नाही. मात्र सदर साहित्याचा पुरवठा ग्रामपंचायतीने केल्याचे दाखवून ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय निधीवर डल्ला मारून शासनाची फसवणूक केली आहे.
टेंभा जिल्हा परिषद शाळेत जाऊन अधिक चौकशी केली असता आणि शाळा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या लेखी माहितीनुसार कॉम्प्युटर ची खरेदी दस्तरखुद शाळेनेच केली आहे. लॅपटॉप चा पुरवठा क्युरीयन सर्व्हीस मुंबई यांच्याकडून झालेला आहे. प्राजेक्टर हे एल.एल.एफ अंतर्गत प्राप्त झाले आहे. शाळेला स्मार्ट टीव्ही डॉ. उमेश पी. समर्थ यांच्याकडून भेट देण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे श्री. मोहन के. ठाकरे यांनी दिले आहेत आणि विद्यार्थ्यांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे म्हणून एल.एल.एफ सी ; (एनपीसीआय ) अंतर्गत लावून देण्यात आलेले आहेत. असे असतांना ग्रामपंचायतीने आपण शाळेला साहित्य पुरवठा केल्याचे दाखवून लाखोचा भ्रष्टाचार केलेला आहे.
टेंभा ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार प्रकरणाची लेखी तक्रार ग्रामस्थांनी 7 सप्टेंबर 2026 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.. परंतू अद्यापही प्रशासकीय पातळीवरून कोणतीही चौकशी अथवा कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण राजकीय दबाव अथवा प्रशासकीय पातळीरून दडपण्याचा प्रयत्न तर केला जात नसावा, अशी शंका ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
टेंभा ग्रामपंचायती मध्ये साहित्य खरेदीच्या नावाखाली करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे आणि दोषींकडून शासकीय रक्कमेची वसूली करण्यात यावी. दोषींवर आठवडाभरात कारवाई न झाल्यास छत्रपती सेनेच्या नेतृत्वात जिल्हा परिषद कार्यालया समोर टेंभा येथील शेकडो नागरिकांच्या उपस्थित जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अरविंद कात्रटवार यांनी प्रशासनाला दिला. होता