जिल्हा

 विमानतळासाठी सेमाना पुढील जंगलाचा पर्याय तपासा : – आसपाची भूमिका ** शेतकऱ्यांच्या  बेमुदत साखळी आंदोलनाला आजाद समाज पार्टीचा जाहीर पाठिंबा

AVB NEWS गडचिरोली : गुरवळा येथे विमानतळासाठी करण्यात येत असलेल्या भूमी अधिग्रहणाच्या विरोधात आजपासून सुरू करण्यात आलेल्या बेमुदत साखळी आंदोलनाला आजाद समाज पार्टीने जाहीर पाठिंबा दिला आहे. आंदोलनस्थळी भेट देऊन पक्षाचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे आणि पक्षाचे प्रवक्ते तुषार रामटेके यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन दिले.

आजाद समाज पार्टीने विमानतळाला विरोध नसून विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करण्याच्या पद्धतीला विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

“शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी पर्यायी जागेचा विचार का नाही?”

आजाद समाज पार्टीच्या म्हणण्यानुसार, पक्षाला वनविभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सेमाना देवस्थानासमोरील गडचिरोली ते वाकडी परिसरात जवळपास 4500 ते 5000 हेक्टर फारसा उपयोगात नसलेली झुडपी जंगलाची जमीन उपलब्ध असल्याची माहिती आहे. पक्षाच्या माहितीनुसार हा परिसर Reserve Forest म्हणून नोंद असलेल्या जमिनीपेक्षा वेगळा आहे.

विमानतळासाठी शासनाला सुमारे 311.48 हेक्टर जमीन आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उपलब्ध पर्यायी शासकीय/वनजमिनींचा सखोल अभ्यास करून, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचवता येतील का, याचा शासनाने प्रथम विचार करावा, अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे.

“सुरजागडमध्ये जंगलासाठी वेगळे निकष आणि विमानतळासाठी वेगळे का?”

जर जंगलाचा वापर केल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचे शासनाचे म्हणणे असेल, तर सुरजागड परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगल क्षेत्राचा वापर खाण प्रकल्पासाठी केला जात असताना विमानतळासाठी पर्यायी जंगल क्षेत्राचा विचार का केला जात नाही? असा सवाल आजाद समाज पार्टीने उपस्थित केला आहे.

पक्षाचा प्रश्न स्पष्ट आहे—

“विकास करायचा असेल तर तो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊनच का? उपलब्ध पर्यायी जागांचा अभ्यास करून शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्याचा प्रयत्न शासनाने का करू नये?”

वनविभागाकडे अद्याप प्रस्तावच नाही?

आजाद समाज पार्टीने केलेल्या माहितीनुसार, सेमाना पुढील जंगलाचा विमानतळासाठी पर्याय म्हणून वापर करण्याबाबत शासनाकडून वनविभागाकडे अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे शासनाने एकतर्फी भूमी अधिग्रहण करण्यापूर्वी पर्यायी जागांचा सर्वंकष अभ्यास करावा, अशी मागणी पक्षाने केली आहे.

गुरवळा, राखी, हिरापूर, शिरपूरच्या शेतकऱ्यांचा विरोध-

गुरवळा, राखी, हिरापूर आणि शिरपूर परिसरातील शेतकऱ्यांनीही आजाद समाज पार्टीच्या या भूमिकेला समर्थन दिले आहे.

“विकासाला आमचा विरोध नाही; मात्र आमच्या सुपीक जमिनी घेऊनच विकास करायचा असेल तर शेतकरी त्याला विरोध करतील,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मांडली.

“कायदेशीर प्रक्रिया आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलू नका”-

आजाद समाज पार्टीने आरोप केला आहे की, स्थानिक नागरिकांचा विरोध आणि भूमी अधिग्रहणाशी संबंधित कायदेशीर प्रक्रियेचा पुरेसा विचार न करता शासनाकडून विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पुढे नेली जात आहे.

“विमानतळ हवा; पण शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उद्ध्वस्त करून नाही. पर्यायी जागा उपलब्ध असेल तर आधी तिचा विचार करा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवा,” अशी ठाम भूमिका आजाद समाज पार्टीने मांडली आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.