जिल्हा

पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करा * आजाद समाज पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात ठराव; आरोग्य-शिक्षण प्रश्नांसाठी हेल्पलाईनची घोषणा

पहिल्या टप्प्यात ३५ ‘प्रतिसरपंच’ नियुक्त; सतीश कुसराम कार्याध्यक्ष तर तुषार रामटेके जिल्हा प्रवक्ते

AVB NEWs गडचिरोली : आजाद समाज पक्ष, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन कात्रटवार सभागृह, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक बांधणी, ग्रामपातळीवरील जनतेच्या प्रश्नांवर लढा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी याबाबत या संमेलनात सविस्तर चर्चा करण्यात आली.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश सचिव दिगंबर पलटणकर होते. महाराष्ट्र प्रदेश युवा महासचिव संदीपदादा मोरे व विदर्भ सचिव धर्मानंद मेश्राम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा प्रभारी विनोद मडावी तसेच विशेष अतिथी म्हणून ॲड. कैलास जाधव, देवाभाऊ साळवे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत सातार, चेतन काटेंगे, जिल्हा महासचिव अंकुश कोकोडे, जिल्हा संघटक हंसराज उराडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विवेक खोब्रागडे होते.

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी-

भारत कृषिप्रधान देश असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा मुद्दा संमेलनात मांडण्यात आला. शेतकऱ्यांच्या समस्या, कर्जबाजारीपणा, उत्पादन खर्च, बाजारभाव, सिंचन, पीकविमा आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या प्रश्नांना विधिमंडळात अधिक संघटित प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करण्याचा ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला. ज्याप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून पदवीधर मतदारांना आपल्या प्रतिनिधीची निवड करण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे, त्याच धर्तीवर नोंदणीकृत शेतकरी आयडीधारकांना मतदानाचा अधिकार देऊन शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारा आमदार निवडण्याची व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

सदर ठराव आजाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

गावागावात ‘प्रतिसरपंच’; पहिल्या टप्प्यात ३५ नियुक्त्या

ग्रामपातळीवरील नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणे, ग्रामविकासातील अनियमितता व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनतेचा सजग प्रतिनिधी म्हणून ‘प्रतिसरपंच’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात एकूण ३५ ग्रामपंचायतींसाठी प्रतिसरपंच नियुक्त करण्यात आले. त्यामध्ये वाकडी येथील विजय देवतळे, मार्कंडा येथील रत्ना सरपे, येडानूर येथील नितेश पोटावी, विहीरगाव येथील मुकेश सहारे, मालेवाडा येथील संतोष मोहुर्ले, बांधगाव येथील भास्कर वट्टी यांच्यासह विविध गावांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

आरोग्य व शिक्षणासाठी हेल्पलाईन-

गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आजाद समाज पक्षाच्या वतीने स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. हेल्पलाईन नंबर लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

शासकीय रुग्णालयातील समस्या, उपचारातील अडचणी, आरोग्यसेवेतील त्रुटी, शाळा व शिक्षकांशी संबंधित प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अडचणी तसेच शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारी पक्षाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी या हेल्पलाईनचा उपयोग केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.