नगरसेविका शिल्पा हेमके यांच्यावर अनाधिकृत बांधकाम केल्याचा आरोप, सदस्यत्व रद्द करण्याची बीआरएसपीची मागणी, नगरसेविका शिल्पा हेमके यांनी केेले आरोपाचे खंडन

एव्हीबी न्युज गडचिरोली “- नगर परिषद गडचिरोलीच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती शिल्पा अंकित हेमके (शिल्पा उद्धवराव गव्हारे) यांच्या कथित अनधिकृत बांधकामप्रकरणी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे नगरसेवकपद रद्द व अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या गडचिरोली जिल्हा शाखेने आज पत्रकार परिषदेत केली.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ कमेटी सदस्य मिलिंद बांबोळे यांनी सांगितले की, जिल्हा सहआयुक्त (न.प. प्रशासन), जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्याधिकारी, नगर परिषद गडचिरोली यांना पत्र देऊन मौजा गडचिरोली येथील सर्वे क्रमांक ११/१-क, भूखंड क्रमांक ६६ वरील अनधिकृत बांधकामाची चौकशी करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
पक्षाच्या आरोपानुसार, सदर भूखंड नगर परिषदेकडे गहाण राखीव असतानाही तेथे बांधकाम करण्यात आले असून, बांधकामासाठी आवश्यक परवानगी अथवा मंजूर नकाशा उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणात नगरसेविका शिल्पा हेमके व त्यांचे पती अंकित हेमके यांच्या सहभागाबाबत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.
आठ दिवसांचा कालावधी उलटूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई झालेली नाही, असा आरोप पक्षाने केला. त्यामुळे तातडीने फौजदारी कारवाई करून नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द व अपात्रतेची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पक्षाने दिला.पत्रकार परिषदेला अॅड. संजय जनबंधू (जिल्हाध्यक्ष, वकील आघाडी), अरविंद वाळके (जिल्हा महासचिव), तसेच चंद्रप्रकाश गेडाम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
: पत्रकार परिषद नंतर गडचिरोली च्या नगरसेविका शिल्पा अंकित हेमके यांची प्रतिक्रिया घेतली असता, सदर भूखंड वर तात्पुरता बांधकाम असून येथे ले आउट चे काम सुरु आहे. त्याचे साहित्य ठेवण्यासाठी हे बांधकाम आहे. या बाबत नगर परिषद ने मला नोटीस दिली. त्याला गडचिरोली सेशन कोर्ट मध्ये आवाहन दिले आहे. कोर्ट जो निर्णय देईल. तो मला मान्य राहील. हा विरोधकांचा बिनबुडाचा आरोप आहे.अशी प्रतिक्रीया नगरसेविका शिल्पा हेमके यांनी दिली