जिल्हा

डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याचा निर्धार …. ८ नोव्हेंबरला अहेरीत ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’

AVB NEWS गडचिरोली :  डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याचा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. या मागणीसाठी विदर्भातील ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांत जनजागरण करण्यात येणार असून, त्याचाच भाग म्हणून ८ नोव्हेंबरला अहेरी येथे ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

अहेरी येथील महागाव रोडवरील इंडियन पॅलेस फंक्शन हॉलमध्ये दुपारी १ वाजता होणाऱ्या या मेळाव्याचे अध्यक्षस्थान समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. वामनराव चटप भूषविणार असून, उद्घाटन ‘देशोन्नती’चे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्यासह विदर्भ आंदोलनातील विविध पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

माजी खासदार राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी १९५७ मध्ये नागविदर्भ आंदोलन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भासाठी लोकलढा उभारला होता. त्यानंतर माजी आमदार राजे सत्यवानराव आत्राम यांनीही ही चळवळ पुढे नेली. त्यामुळे अहेरीतून पुन्हा विदर्भ आंदोलनाची ज्योत पेटविण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला.

२८ सप्टेंबरला ‘नागपूर करार होळी’ आंदोलन

नागपूर करारातील आश्वासनांची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करीत २८ सप्टेंबर रोजी विदर्भातील ११ जिल्हे व १२० तालुक्यांत ‘नागपूर करार होळी’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीने जाहीर केले.

महाराष्ट्रावरील वाढते कर्ज, विदर्भाचा सिंचन व इतर क्षेत्रातील अनुशेष आणि राज्यातील पोलीस दलातील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांचा दाखला देत स्वतंत्र विदर्भ हाच विकासाचा पर्याय असल्याचा दावा समितीने पत्रकार परिषदेत केला.

मेळाव्यास विदर्भातील नागरिक, युवक, महिला आणि विदर्भवादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

पत्रकार परिषदेला अरुण मुनघाटे, अशोक पोरेड्डीवार, कपील इद्दे, प्रकाश ताकसांडे, चंद्रशेखर भडांगे, सुनील पोरेड्डीवार, मारोतराव बोथले, मोतीराम लाटेलवार आदी उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.