गडचिरोलीत पुरामुळे 25 मार्ग बंद, : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा * भामरागडमधील 700 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

AVB NEWS गडचिरोली, : गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील पावसाची स्थिती, पूरग्रस्त भागातील उपाययोजना आणि प्रशासनाकडून सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.
जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 123 मिमी पावसाची नोंद झाली असून काही भागांत 200 मिमीपर्यंत अतिवृष्टी झाली आहे. छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पूराचा धोका लक्षात घेऊन भामरागड तालुक्यातील सुमारे 700 नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. या नागरिकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था विविध आश्रमशाळा तसेच अन्य सुरक्षित ठिकाणी करण्यात आली असून प्रशासनाकडून आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) तैनात असून जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणा परस्पर समन्वयातून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण 24 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले असून या ठिकाणी पोलीस यंत्रणेमार्फत नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत बचाव व मदतकार्य प्रभावीपणे सुरू ठेवण्यास सांगितले. पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून कोणतीही जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील पावसाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून संबंधित सर्व यंत्रणा दक्षतेने कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
पुरामुळे बंद असलेले मार्ग
1) आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353 C ( मोसम नाला )
2) आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग 353C (दिना नदी )
3)कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग-377 (सती नदी) तालुका कुरखेडा
4) एटापल्ली कसनसूर रस्ता राज्यमार्ग 363 ता. एटापल्ली झुरी नाला
5) गट्टा नाका ते एटापल्ली पोचमार्ग स्थानिक नाला
6) धानोरा ते रांगी रस्ता राज्यमार्ग 368 ता. धानोरा
7) रोमपल्ली झिंगानूर रस्ता प्रजिमा 26 ता. सिरोंचा
8) एटापल्ली गट्टा रस्ता राज्यमार्ग 381 ता. एटापल्ली (बांडिया नदी पूल, अलदंडी पूल, तुमरगुडा नाला व जांबिया गावाजवळ, नेंडेर गावाजवळ )
9) मुलचेरा आलापल्ली रस्ता राज्यमार्ग 370 ता. मुलचेरा
10) अहेरी देवलमारी वट्रा रस्ता राज्यमार्ग 370 (वट्रा नाला)
11) पोटेगाव देवापूर घोट रस्ता राज्यमार्ग 378 ता. गडचिरोली
12) कसनसूर रेगडी रस्ता राज्यमार्ग 380 ता. एटापल्ली (वेनापूर, झरी, कोटमी जवळ )
13) एटापल्ली देवदा (हेटलकसा गावाजवळ )
14) आष्टी एल्लूर चौडमपल्ली प्रजिमा 53 ता. चामोर्शी (चौडमपल्ली नाला )
15) गणपूर विठ्ठलपूर रस्ता प्रजिमा 54 ता. चामोर्शी (चांदेश्वर नाला )
16) वैरागड देलणवाडी प्रजिमा 8 ता. आरमोरी
17) ताडगाव दामरंचा रस्ता ता. भामरागड
18) वैरागड रांगी रस्ता राज्यमार्ग 368 ता. आरमोरी
19) घोट सुभाषग्राम रस्ता राज्यमार्ग 378 ता. चामोर्शी
20) कढोली ते उराडी प्रजिमा 7 ता. कुरखेडा
21) चांडाळा गुरवळा रस्ता राज्यमार्ग 379 ता. गडचिरोली
22) घोट रेगडी रस्ता राज्यमार्ग 380 (रेगडी जवळ )
23) कुरुड वडसा रस्ता प्रजिमा 47 ता. देसाईगंज
24) कासावी उसेगाव कोरेगाव प्रजिमा 49 ता. देसाईगंज
25) चातगाव रांगी प्रजिमा 36 ता.गडचिरोली (खुर्सा गावाजवळ )
स्रोत – सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली