जिल्हा

दिल्लीतील आंदोलनाची धग गडचिरोलीत, केंद्र सरकारविरोधात केली निदर्शने

गडचिरोली : नीट पेपरफूट प्रकरणी राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने करण्यात आली. रविवारी निर्माण युवा संघटनेने धानोरा मार्गावर निदर्शने करत एक दिवसाचा उपवास केल्यानंतर सोमवारी (दि.20) दुपारनंतर शहरातील इंदिरा गांधी चौकात सामाजिक-राजकीय संघटनांच्या पुढाकाराने विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

या आंदोलनात काँग्रेस, माकप, शिवसेना उबाठा, आझाद समाज पक्ष, आदिवासी विकास परिषद, सत्यशोधक शिक्षक सभा अशा विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन आंदोलकांना मार्गदर्शन केले. दरम्यान शेतकरी कामगार पक्षानेही राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देऊन आपल्या भावना मांडत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

दिल्ली येथील जंतर-मंतरवर सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक व अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ, तसेच केंद्र सरकारच्या तानाशाही प्रवृत्तीच्या निषेधार्थ हे एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन आयोजित केले होते. जिल्ह्यातील युवक-युवती, विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक-राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी होत सरकारच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

आंदोलनाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. त्यानंतर विविध वक्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता, नीट पेपरफुट, बेरोजगारी, लोकशाहीवरील संकट आणि युवकांच्या भवितव्याबाबत सरकारवर टीका केली. यावेळी युवकांनी जोरदार नारेबाजीतून तीव्र नाराजीचा प्रत्यय दिला. आंदोलनादरम्यान पावसाने अचानक हजेरी लावली. मात्र, पावसाची पर्वा न करता युवकांनी आंदोलन सुरूच ठेवत घोषणाबाजी आणि निषेध कायम ठेवला. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हे आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले.

यावेळी नीट पेपरफुटीच्या प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या 21 युवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जवळपास तीन तास चाललेल्या या आंदोलनात युवक-युवतींसह पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा, मागण्या आणि संताप फलकांवर लिहून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आंदोलनस्थळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पवन गेडाम, आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड, भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद खान, ओबीसी युवा संघटनेच्या संतोषी सूत्रपवार, काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल होळी, जंगोरायताड आदिवासी संघटना, महिला मैत्री संघ आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला व आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केले. त्यांनी शिक्षणातील पारदर्शकता, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि युवकांच्या भविष्याच्या प्रश्नांवर संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. आभार प्रदर्शन ओबीसी युवा संघटनेच्या संतोषी सूत्रपवार यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

आंदोलनात विवेक खोब्रागडे, अमोल मारकवार, जी. के. बारसिंगे, शीतल नरवडे, सोनाशी लभाने, ईश्वरी काळे, डॉ.शिल्पा आठवले, डॉ.प्रशांत सातार, प्रतीक डांगे, सतीश कुसराम, प्रितेश अंबादे, गणेश वरखडे, दिवाकर साखरे, नागसेन खोब्रागडे, डॉ.उज्वला सहारे, प्रकाश बन्सोड, नितीन वेस्कडे, विश्वरत्न युथ फउंडेशनचे वृषभ रामटेके, साहिल बोदेले, प्रतीक खोब्रागडे, मोनल सहारे, प्रियांक काळे, यश गलगट, आदिनाथ जाधव यांच्यासह शेकडो युवक-युवतींनी सहभाग घेतला.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.