जिल्हा

गडचिरोलीच्या बांबू सहकार मॉडेलचा राज्यस्तरावर गौरव..!  * गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेला ‘सहकार ग्रामविकास पुरस्कार’

AVB NEWS गडचिरोली :-  गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात बांबू उद्योगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढ आणि ग्रामीण विकासाचे यशस्वी सहकार मॉडेल उभारणाऱ्या गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेला यंदाचा प्रतिष्ठेचा ‘सहकार ग्रामविकास पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या सोहळ्याला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल  नार्वेकर, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण, आ. प्रवीण  दरेकर, विद्याधर अनास्कर, आ. विनय कोरे, मंत्री मंगलप्रसाद लोढा, मंत्री उदय सामंत, आ. प्रसाद लाड यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी जिल्ह्यात शेतकऱ्यांना त्यांच्या बांबू लागवडीचे योग्य मूल्य मिळावे तसेच स्थानिक सुशिक्षित युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा या दूरदृष्टीतून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी सहकारी तत्त्वावर गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेची स्थापना केली. आज संस्थेशी सुमारे ८७० सभासद जोडले गेले असून, बांबू उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचे कार्य सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक बांबू संसाधनावर प्रक्रिया करून बांबू फ्लोअरिंग टाइल्स, फर्निचर तसेच विविध मूल्यवर्धित बांबू उत्पादने तयार करणारा आधुनिक उद्योग प्रकल्प संस्थेने उभारला आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या धर्तीवर शेतकऱ्यांकडून उत्पादित बांबूवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचा हा राज्यातील पहिलाच सहकारी प्रयोग मानला जात असून, ग्रामीण औद्योगिकीकरणासाठी तो आदर्श मॉडेल ठरत आहे.

दुर्गम आदिवासी भागात रोजगारनिर्मिती, स्थानिक संसाधनांचे मूल्यवर्धन, शेतकरी सक्षमीकरण आणि सहकार चळवळीला नवे स्वरूप देणाऱ्या या अभिनव प्रकल्पाची दखल घेत महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांनी संस्थेला ‘सहकार ग्रामविकास पुरस्कार’ प्रदान करून गौरव केला. या सन्मानामुळे गडचिरोलीच्या बांबू उद्योगाला राज्यस्तरावर नवी ओळख मिळाली असून, आदिवासी भागातील सहकारावर आधारित विकास मॉडेलला मोठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.