जिल्हा

विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन च्या  अंमलबजावणीसाठी जास्तीत जास्त जॉब कार्ड काढा  * दिभना येथे अधिनियमाच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांचे आवाहन

AVB NEWS गडचिरोली  : ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराची हमी, शाश्वत उपजीविका आणि सर्वांगीण विकासाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने लागू केलेल्या विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अधिनियम-२०२५ (जी-राम-जी)च्या जिल्हास्तरीय अंमलबजावणीचा शुभारंभ गुरुवारी मौजा दिभना येथे उत्साहात करण्यात आला. या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी जॉब कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी (विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन) स्मिता बेलपत्रे, तहसीलदार सागर कांबळे, सरपंच रमेश गुरनुले, सहाय्यक गटविकास अधिकारी बेडके, नायब तहसीलदार वनिश्याम येरमे, ग्रामपंचायत सदस्य धनराज जेंगठे, ज्योती जेंगठे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अधिनियम-२०२५ ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी महसूल सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामरोजगार सेवक तसेच इतर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी गावागावांत जनजागृती करून नागरिकांना जॉब कार्ड काढण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले.

या अधिनियमांतर्गत जलसुरक्षा, विहिरी, जलसंधारणाची कामे, तलाव निर्मिती, ग्रामीण रस्ते व दळणवळण सुविधा, शेतीपूरक पायाभूत सुविधा, साठवणूक केंद्रे तसेच शाश्वत ग्रामीण मालमत्ता निर्माण करणाऱ्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या विकासकामांमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीबरोबरच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि कृषी उत्पादनवाढीसही चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी अधिनियमाची उद्दिष्टे स्पष्ट करताना सांगितले की, ग्रामीण नागरिकांना आर्थिक बळकटी देण्यासाठी आणि गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे, वैयक्तिक लाभाची कामे आणि रोजगारनिर्मितीची विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून शाश्वत विकासाचा पाया अधिक मजबूत होईल.

यावेळी गडचिरोली तालुक्यात विक्रमी धान उत्पादन करून प्रथम क्रमांक मिळविलेल्या आदर्श शेतकरी अशोक जेंगठे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार वनिश्याम येरमे यांनी केले, तर आभार तहसीलदार सागर कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामसेविका वासंती देशमुख, पंचायत समिती गडचिरोली येथील दीपाली भरडकर, माधुरी मैद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी शुभम धंदरे, ग्रामरोजगार सेवक तसेच ग्रामपंचायत दिभना येथील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.