माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

AVB NEWs गडचिरोली :- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त केक कापण्याऐवजी समाजातील घटकांच्या सेवेला प्राधान्य देत दिवसभर विविध सेवाकार्यांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी चामोर्शी रोडवरील जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यानंतर गडचिरोलीचे आराध्य दैवत सेमाना देवस्थान येथे दर्शन व पूजा-अर्चना करून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
यानंतर चामोर्शी रोडवरील मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांची भेट घेण्यात आली. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्यासोबत संवाद साधून वाढदिवसाचा आनंद वाटून घेण्यात आला.
त्यानंतर गांधी चौक येथील महिला व बाल रुग्णालयात ‘एक घास माणुसकीचा’ या उपक्रमांतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनाचे वाटप करण्यात आले. रुग्णांना फळांचे वितरण करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.
यावेळी समाजातील गरजू घटकांप्रती संवेदनशीलता आणि सेवाभाव जपण्याचा संदेश देण्यात आला.
याच वाढदिवसानिमित्त डॉ. अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ₹१ लाखांचा धनादेश देऊन सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधोरेखित केली. समाजहितासाठी योगदान देण्याची त्यांची ही भावना उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
सायंकाळी गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर येथील विला अर्बन फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट येथे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था व नागरिकांनी उपस्थित राहून डॉ. अशोकजी नेते यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व निरंतर जनसेवेच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्रांसह विविध भागांतून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी दिवसभर जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन पुष्पगुच्छ अर्पण करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
विशेष म्हणजे, डॉ. अशोकजी नेते यांनी वाढदिवस कोणताही दिखाऊपणा न करता केक न कापता, समाजसेवेच्या माध्यमातून साजरा करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली. सेवाभाव, पर्यावरण संरक्षण, ज्येष्ठांचा सन्मान, रुग्णसेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर संगम असलेला हा वाढदिवस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.