जिल्हा

कोरची तालुक्यात निकृष्ट बंधाऱ्यानंतर आता निकृष्ट पुल बांधकाचे प्रकरण उघडकीस !  * सहाय्यक मुख्य अभियंत्यांनी दिले चौकशीचे आदेश    * तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिले होते कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

एव्हीबी न्यूज   गडचिरोली :-  विकासापासून वंचीत असलेल्या कोरची तालुक्यात विकासाकामांचा बटयाबोळ सुरू असल्याचे चित्र आजही दिसून येत आहे. तालुक्यात निकृष्ट बंधारे बांधकाम प्रकरणानंतर आता निकृष्ट पूल बांधकामाचे प्रकरण उजेडात आले आहे. नाडेकल बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवर बांधण्यात आलेला कोटयावधीचा पुल रहदारी सुरू होण्यापुर्वीच कोसळला. या गंभिर प्रकरणाबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई  करण्यात  आली नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विशेष म्हणजे पाच वर्षापुर्वी कोरची तालुक्यातील हुडूकदुम्मा येथे जलयुक्त शिवार योजने अंतर्गत निकृष्ट बंधारे बांधकामाचे प्रकरण उजेडात आले होते. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी कंत्राटदार व दोषी अधिकार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सबंधीतांवर कारवाई सुध्दा करण्यात आली होती.  जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांच्या  तक्रारीच्या अनुषंगाने  कोरची तालुक्यातील नाडेकल बेतकाठी मार्गावरील निकृष्ट पुल बांधकामाच्या चौकशीचे आदेश सहाय्यक मुख्य अभियंता यांनी अधीक्षक अभियंता यांना दिले आहेत. या प्रकरणात कंत्राटदार व अधिकार्यांवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरची तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हुडूकदुमा येथे जलयुक्त शिवार योजने अंतर्गत बांधण्यात आलेले दोन बंधारे पहिल्याच पावसाळयात वाहून गेल्याचे प्रकरण सन 2019 मध्ये उघडकीस आले होते. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची समिती नेमण्यात आली होती. चौकशीत बंधाऱ्यांची कामे निकृष्ट करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. निकृष्ट काम करून शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी कंत्राटदार व दोषी अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार आता कोरची तालुक्यातील नाडेकल बेतकाठी मार्गावरील निकृष्ट पुल बांधकाम प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात असून निकृष्ट कामांना आळा घालण्यासाठी जिल्हाघिकारी अविश्यांत पंडा यांनी सुध्दा या प्रकरणाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे. निकृष्ट पुल बांधकाम प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यााची मागणी केली जात आहे.

दोषींवर कारवाई करा :-  जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार    यांची मागणी 

कोरची तालुक्यातील नाडेकल बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवर  बांधण्यात आलेला पुल रहदारी सुरू होण्यापुर्वी कोसळला. या पुल बांधकामाची पाहणी केली असता पुलाचे निकृष्ट काम करून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या प्रकरणात दोषींवर फौजदारी कारवाई करून शासकीय रक्कमेची वसूली करण्यात यावी अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार  यांनी केली आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.