को-ऑपरेटीव्ह बॅंकांमधील शिपाई पदभरती होणार ऑफलाईन * नोकरभरतीच्या ऑनलाईन प्रक्रियेतून वगळले, स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या ऑनलाईन नोकरभरती प्रक्रियेतून शिपाई पद वगळले आहे. त्यामुळे शिपाईपदाची नोकरभरती आता ऑफलाईन प्रक्रियेने राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सदर पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधील नोकरभरती पारदर्शक होण्याच्या दृष्टीने शासन निर्णयान्वये सुचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. बॅंकेच्या आॅनलाईन भरती प्रक्रीयेतून सुरक्षारक्षक, वाहनचालक हे चतुर्थश्रेणी कर्मचारी पदे वगळण्यात आली आहेत. याच धर्तीवर चतुर्थश्रेणीतील शिपाई पद वगळण्यात आले आहे. शिपाई पदासाठी शैक्षणिक अहर्ता 12 वी उत्तीर्ण राहील.
चतुर्थश्रेणी नोकरभरतीत बॅंक स्तरावरून ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घेणे अनिवार्य राहील. बैॅंकेने सदर परीक्षा अनुभवी व तज्ञ एजन्सी मार्फत घेणे आवश्यक राहिल. चतुर्थ श्रेणीपदभरती मध्ये स्थानिक उमेदवारांना 100 टक्के प्राधान्य देण्यात यावे. तथापी या श्रेणीतील पदभरती करीता स्थानिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्हयाबाहेरील उमेदवारास प्राधान्य देण्यास मुभा देता येईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.