गडचिरोलीत जिल्हाप्रमुख पदासाठी नव्या नियुक्त्या जाहीर होताच हा वाद पेटला ! * उबाठा शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस चव्हाटयावर , * जिल्हाप्रमुख बदलताच माजी जिल्हाप्रमुखांकडून कार्यालयाची तोडफोड
AVB NEWS गडचिरोली : गडचिरोलीतशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत धूसफूस चव्हाटयावर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेना माजी जिल्हाध्यक्षाने कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.
गडचिरोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला आहे. जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती होताच पक्ष कार्यालयातच तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कार्यालयातील पीओपी फोडण्यात आली, तर टेबल, खुर्च्या, पंखे, एसी आणि अगदी बल्बसुद्धा माजी जिल्हाप्रमुखांनी काढून नेले आहे. गडचिरोली जिल्हाप्रमुख पदासाठी नव्या नियुक्त्या जाहीर होताच हा वाद पेटला. शिवसेना उबाठा पक्षाने गडचिरोली आणि आरमोरी विधानसभेसाठी पवन गेडाम आणि अहेरी विधानसभेसाठी दिलीप सुरपाम यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. मात्र, यापूर्वी जिल्हाप्रमुख असलेल्या वासुदेव शेडमाके यांनी पक्षाने आपल्याला डावलल्याच्या नाराजीतून कार्यालयातील साहित्य काढून नेले. एकीकडे नव्या नियुक्त्यांमुळे संघटनात्मक बदल करण्यात आले, तर दुसरीकडे पक्ष कार्यालयातील तोडफोडीमुळे शिवसेना उबाठा गटातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. आता या प्रकरणावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय :- वासुदेव शेडमाके
गेल्या तीन दशकापासून शिवसेनेचा सच्चा शिवसैनिक म्हणून काम करीत आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. परंतू आता नवख्या कार्यकर्त्यांना थेट जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करणे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना मनाला ठेच पोहचविण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रीया माजी जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांनी व्यक्त करीत नवीन जिल्हा प्रमुख नियुक्त करण्याच्या पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.